पंतप्रधान मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत, गगनचुंबी बुर्ज खलिफा रंगला तिरंग्यात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, अबु धाबी
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून शनिवार, 15 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) पोहोचले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर दुबईच्या बुर्ज खलिफा या गगनचुंबी इमारतीवर भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग प्रदर्शित करण्यात आले. तसेच मोदींच्या या दौऱ्यात व्यापार आणि चलनविषयक महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आखाती राष्ट्रात आयआयटी-दिल्लीचे पॅम्पस सुरू करण्यासंबंधीही बोलणी झाली.
पंतप्रधान मोदी शनिवारी एक दिवसीय दौऱ्यावर यूएईला पोहोचल्यानंतर त्यांनी अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापक चर्चा केली. यादरम्यान दोन्ही देशांनी आपापल्या चलनात व्यापार करार सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त करताना गेल्यावषी सर्वसमावेशक आर्थिक भागिदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-युएई यांच्यातील व्यापारात 20 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांनी आतापर्यंत 85 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे लक्ष्य गाठले असून लवकरच ते 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. उभय देशांच्या चलनातील व्यापारावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी झालेल्या करारातून दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास दिसून येतो. या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
मध्यवर्ती बँकांमध्ये करार
भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल बँक ऑफ युनायटेड अरब अमिराती यांनी शनिवारी सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांचा वापर आणि त्यांच्या पेमेंट आणि मेसेजिंग सिस्टमला एकमेकांशी जोडण्यासाठी सहकार्यासाठी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पीएम मोदी आणि युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या उपस्थितीत अबुधाबीमध्ये दोन सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचीही मुख्य उपस्थिती होती. अखंड सीमापार व्यवहार आणि देयके सुलभ करणे हे या करारांचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच दोन्ही देशातील अधिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आरबीआय गव्हर्नर दास आणि युएईच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बलमा यांनी संबंधित करारांवर स्वाक्षरी केली.
पंतप्रधानांचे जल्लोषी स्वागत
अबुधाबीला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद यांनी स्वागत केले. स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे आपला संदेश सर्वदूर केला. पंतप्रधान मोदींचे अबुधाबी विमानतळावर आगमन होताच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही भारत-युएईमधील द्विपक्षीय भागिदारी नव्या क्षितिजाकडे जात असल्याचे ट्विट केले. नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा युएई दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी फ्रान्सच्या दौऱ्यावर होते.
शिक्षणविषयक महत्त्वाचा करार
भारताचे शिक्षण मंत्रालय आणि अबू धाबीच्या शिक्षण आणि ज्ञान विभागाने आखाती देशात आयआयटी-दिल्ली पॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली ही आयआयटी मद्रास नंतर ऑफशोअर पॅम्पस स्थापन करण्याची घोषणा करणारी दुसरी संस्था आहे. गेल्या आठवड्यात आयआयटी मद्रासने टांझानियामधील झांझिबारमध्ये पॅम्पस उभारण्यासाठी सामंजस्य करार केला.