विश्वचषकाची ठरेल तालीम, श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीवर राहील लक्ष, सूर्यकुमारला आणखी एक संधी
वृत्तसंस्था /मोहाली
भारताच्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेला आज गुरुवारपासून सुरुवात होत असून पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषकाची तालीम या नजरेतून या मालिकेला महत्त्व आहे. यात श्रेयस अय्यरच्या मॅच-फिटनेसची अंतिम चाचणी होईल, तर सूर्यकुमार यादवला आपली निराशाजनक एकदिवसीय कामगिरी बदलण्याची त्यातून आणखी एक संधी प्राप्त होईल. भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये आघाडीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यासोबत विश्रांती दिलेली असल्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला यांना इतर खेळाडूंचे मूल्यांकन करण्याची अंतिम संधी मिळेल. 28 वर्षीय अय्यर स्ट्रेस फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेमुळे गेल्या सहा महिन्यांत फारसे क्रिकेट खेळलेला नाही. पाकिस्तानविऊद्धच्या आशिया चषकातील सामन्यापूर्वी त्याची पाठ दुखावली होती. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मात्र निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटले आहे की, अय्यर तीन सामन्यांमध्ये खेळण्याच्या दृष्टीने चांगल्या स्थितीत आहे. परंतु पुढील पाच दिवसांत तीन सामन्यांमध्ये त्याचे शरीर पूर्ण सामन्याचा भार पेलू शकेल की नाही याकडे लक्ष दिले जाईल. इशान किशनने जशी आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे त्याचप्रमाणे अय्यरनेही त्याची भूमिका बजावण्याची गरज आहे. कारण विश्वचषकादरम्यान मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजीवर तो चांगल्या प्रकारे आक्रमण करू शकतो. सूर्यकुमार यादवची मागील 27 एकदिवसीय सामन्यांत सरासरी 25 पेक्षा कमी राहिलेली असून हे त्याच्या प्रतिभेचे किंवा त्याच्या क्षमतेचे खरे प्रतिबिंब नाही. त्याला विश्वचषकादरम्यान मुख्य संघात समावेशाच्या दृष्टीने प्राधान्य मिळणार नसले, तरी त्याच्या स्वत:च्या भल्यासाठी आणि संघ व्यवस्थापनाला त्यांनी चुकीची निवड केलेली नाही हे पटवून देण्यासाठी त्याला या मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.
डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला झालेल्या लहान दुखापतीमुळे 37 वर्षीय रविचंद्रन अश्विन त्याच्या तिसऱ्या विश्वचषकात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर अक्षर ठीक झाला नाही, तर अश्विनला त्याचा शेवटचा विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल. दोन आठवड्यांपूर्वी अश्विन भारतीय संघ व्यवस्थापनाच्या रडारवर देखील नव्हता आणि आता तो व वॉशिंग्टन सुंदर संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. अश्विनने आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तरी त्याचे पारडे वॉशिंग्टनपेक्षा जड आहे. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीमुळे अश्विन आणि वॉशिंग्टन या दोघांना आपले सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळेल.
रोहित नसल्यामुळे इशान किशन शुभमन गिलसह सलामीला येण्याची शक्यता आहे तर कोहलीची जागा अय्यरने घेतली आहे. भारताचा आशियाई खेळांसाठीच्या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा जास्त करून राखीव खेळाडू म्हणून संघात आहे आणि दुसऱ्या सामन्यानंतर त्याला मोकळे केले जाऊ शकते. कारण तो 28 सप्टेंबर रोजी हांगझाऊला जाणाऱ्या टी20 संघात सहभागी होणार आहे. भारताने आपल्या कोणत्याही वेगवान गोलंदाजांला विश्रांती दिलेली नाही. परंतु जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे तीनपैकी दोन सामने खेळू शकतात. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया नुकताच दक्षिण आफ्रिकेकडून 2-3 ने पराभूत झालेला असला, तरी त्यांनी त्या मालिकेत दर्जेदार खेळ केला होता. मात्र कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत त्यांना सतावत आहे. ट्रॅव्हिस हेडच्या दुखापतीमुळे मिळालेल्या संधीचा मार्नस लाबुशेनने फायदा घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मात्र त्यांना पोषक नसलेल्या खेळपट्टीवर कस लागेल.
स्टार्क, मॅक्सवेल दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन
मोहालीतील पंजाब क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर आज शुक्रवारी खेळविल्या जाणार असलेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल हे दुखापतीतून सावरलेले नसल्याने खेळू शकणार नसून स्टिव्ह स्मिथचे मात्र संघात पुनरागमन होईल, अशी माहिती कर्णधार पॅट कमिन्सने दिली. या तिन्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीविषयी माहिती देताना कमिन्सने ही गोष्ट उघड केली. स्थिमला अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागले होते. आपल्यालाही आता चांगले वाटत असून आपल्या मनगटाला झालेली दुखापत निवळली आहे, असे कमिन्सने पुढे स्पष्ट केले.
संघ : भारत-के. एल. राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.