चीनला टाकणार मागे ः संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात दावा
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
लोकसंख्या विस्फोटाला सामोरा जाणारा भारत स्वतःचा शेजारी देश चीनला लोकसंख्येप्रकरणी पुढील वर्षी मागे टाकणार आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगाची लोकसंख्या नोव्हेंबर 2020 पर्यंत 8 अब्जापर्यंत पोहोचणार आहे. परंतु 1950 नंतर पहिल्यांदाच जगाची लोकसंख्या सर्वात कमी वेगाने वाढत असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.
लोकसंख्या वाढण्याचा दर 2020 मध्ये एक टक्क्यांनी कमी झाला आहे. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8 अब्जानजीक पोहोचणार आहे. तर 2030 पर्यंत हा आकडा 8.5 अब्ज तर 2050 पर्यंत 9.7 अब्जावर जाणार आहे. 2080 मध्ये जागतिक लोकसंख्या स्वतःच्या उच्चांकावर पोहोचेल असे मानले जात आहे. त्यावेळी जागतिक लोकसंख्या 10.4 अब्जापर्यंत पोहोचणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमुळे लोकांचे आयुर्मान वाढत असून बाल मृत्यूदर कमी होत आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे दोन देश पूर्व आशिया आणि दक्षिण आशियातील असणार आहेत. या दोन्ही देशाची एकूण लोकसंख्या 2.3 अब्ज असेल. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 29 टक्के असणार आहे. 2050 पर्यंत 8 देशांमध्ये लोकसंख्या वाढणार असून यात पाकिस्तान, कांगो, इजिप्त, इथियोपिया, नायजेरिया, भारत, फिलिपाईन्स आणि टांझानिया यांचा समावेश आहे.