वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या दोन वेटलिफ्टर्सनी मेक्सिकोतील लिऑन येथे सुरू असलेल्या आयडब्ल्यूएफ विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्यपदके मिळविली. त्यात आकांक्षा किशोर व्यवहारे व विजय प्रजापती यांचा समावेश आहे.
शनिवारी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने ही पदके मिळविली. आकांक्षाने महिलांच्या 40 किलो वजन गटात एकूण 127 किलो (59 व 68) वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या 49 किलो वजन गटात विजय प्रजापतीने एकूण 175 (78 व 97) किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. आकांक्षा ही साईच्या औरंगाबादमधील एनसीओईमध्ये ट्रेनिंग घेत आहे तर विजय हा पतियाळातील एनसीओई येथे सराव करीत आहे. ‘या स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. अगदी अल्प कालावधीत राष्ट्रीय शिबिरात त्यांच्या यशासाठी प्रशिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक वाटते,’ असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव सचदेव म्हणाले.