वृत्तसंस्था/ हाँगझोऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी झालेल्या पुरूषांच्या सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारताने दक्षिण कोरियाचा 3-2 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील इतिहासात प्रथमच भारतीय पुरूष बॅडमिंटनपटूंनी सांघिक प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.
या उपांत्य लढतीतील पहिल्या सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयने कोरियाच्या जिनचा 18-21, 21-16, 21-19 असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरूष दुहेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या विद्यमान विश्व चॅम्पियन्स सिओ जेई आणि किंग हेयूक यांनी भारताच्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांचा 21-13, 26-24 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने दक्षिण कोरियाच्या ली युंगयुचा 21-7, 21-9 असा पराभव करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम वोनहो आणि संगसेयुंग यांनी भारताच्या एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला यांच्यावर 21-16, 21-11 अशी मात करत दक्षिण कोरियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या निर्णायक एकेरी सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या जियानओपचा 12-21, 21-16, 21-14 असा फडशा पाडत दक्षिण कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले. तसेच भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.