वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत यजमान भारत-डेन्मार्क यांच्यातील विश्व गट 1 प्ले ऑफ लढत 3-4 फेब्रुवारीला होणार आहे. या लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने पाच जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय डेव्हिस चषक संघामध्ये शशीकुमार मुकुंद, प्रज्नेश गुणेश्वरन, रामकुमार रामनाथन, रोहन बोपण्णा आणि युकी भांब्री यांचा समावेश आहे. सुमित नागलला राखीव खेळाडू म्हणून जाहीर केले आहे. भारतीय डेव्हिस चषक संघाचा रोहित राजपाल हा बहिस्थ कर्णधार आहे. नंदन बाळ यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने भारतीय डेव्हिस चषक संघाची निवड केली. 2022 च्या डेव्हिस चषक स्पर्धेतील विश्व गट 1 प्ले ऑफ लढतीत भारताने दिल्लीत डेन्मार्कचा 4-0 असा पराभव केला होता. ही लढत गेल्या मार्चमध्ये झाली होती. त्यानंतर या स्पर्धेत भारतीय डेव्हिस संघाला विश्व गट 1 मधील लढतीत नॉर्वेकडून 1-3 अशी हार पत्करावी लागली होती.