जीडीपी प्रथमच 350 लाख कोटींच्या वर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) प्रथमच 350 लाख कोटी रुपयांच्या पार केले. 2021 मध्ये भारतीय जीडीपी 264 लाख कोटी ऊपये होता. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात झपाट्याने वाढ होत असल्याचे जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स करणे हे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. गेल्या वषी ब्रिटनला मागे टाकत सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. जीडीपी हा शब्द कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो. भारतातील सकल देशांतर्गत उत्पादन सर्व वस्तू आणि सेवा मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये देशात उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहिल्यास बेरोजगारीची पातळी कमी होते. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.
भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा उल्लेख ‘मुडीज’ने केला आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित कर्मचारी आहेत. तसेच, झपाट्याने शहरीकरण वाढ असल्यामुळे घरे, सिमेंट आणि कारची मागणी वाढेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील पायाभूत सुविधांवर सरकारचा खर्च पोलाद आणि सिमेंट क्षेत्रांना मदत करेल, तर निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या शोधामुळे अक्षय उर्जेमध्ये गुंतवणूक वाढेल. 2030 पर्यंत या क्षेत्रांतील भारताची क्षमता चीनपेक्षा कमी असेल असेही मूडीजने म्हटले आहे.