वृत्तसंस्था/ हांगझाऊ
युवा आघाडीपटू अभिषेकने दोन गोल केल्याने भारतीय हॉकी संघाने गतविजेत्या जपानवर 4-2 ने मात करून आपला सलग तिसरा विजय नोंदवला आणि आशियाई खेळांतील पुरूषांच्या हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले. भारताकडून अभिषेकने (13 वे आणि 48 वे मिनिट) दोन गोल केले, तर मनदीप सिंग आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या बहुतांश भागावर वर्चस्व राखले आणि चेंडूवर ताबा मिळवला, तर जपानने अधूनमधून चमक दाखविली. जपानने चौथ्या आणि शेवटच्या सत्राच्या शेवटच्या पाच मिनिटांत जोरदार झुंज दिली आणि गेन्की मितानी (57 वे मिनिट) आणि योरसेई काटो (60 वे मिनिट) यांनी दोन जलद गोल करून अंतर कमी केले. आज शनिवारी होणाऱ्या ‘अ’ गटातील सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे.
दोन सोप्या विजयांनंतर आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीयांनी जपानविरुद्ध चमकदार सुऊवात केली आणि पाचव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीत सिंगचा फ्लिक दिशाहीन ठरला. दुसऱ्या बाजूने भारताला 12 व्या मिनिटाला स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी कॉर्नरला तोंड द्यावे लागले होते. पण जपानी खेळाडू या संधीचा सदुपयोग करू शकले नाही आणि गोलरक्षक कृष्णबहादूर पाठकने शोता यामादाचा प्रयत्न उधळून लावला.
भारताचा दुसरा पेनल्टी कॉर्नरही वाया गेल्यानंतर एका मिनिटाने हार्दिक सिंगने पुरविलेल्या चेंडूवर रिव्हर्स स्टिकने गोल करत अभिषेकने भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 24 व्या मिनिटाला मनदीपने आपली आघाडी वाढविताना नीलकांताचा पास जाळीत सारला. भारताने चौथा पेनल्टी कॉर्नर गमावल्यानंतर लवकरच पाठोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरचे रोहिदासने शक्तिशाली ड्रॅग-फ्लिकसह गोलात रुपांतर केले. शेवटचे सत्र सुरू होऊन तीन मिनिटे उलटलेली असताना अभिषेकने मनदीपसह चाल रचत आपला दुसरा गोल करून गोलसंख्या 4-0 अशी केली.
पण जपानी खेळाडूंनी शेवटच्या क्षणांमध्ये आपला लढाऊ बाणा दाखविला. त्यांनी तीन मिनिटांच्या कालावधीत तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि मितानीच्या सुरेख प्रयत्नाच्या जोरावर तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्यात यश मिळविले. सामना संपण्यास काही क्षण बाकी असताना जपानने काटोद्वारे चढविलेला प्रतिहल्ला आणखी एक गोल नोंदवून गेला.