वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व हॉकी फेडरेशनच्या ताज्या सांघिक मानांकनात भारतीय हॉकी संघाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नईमध्ये शनिवारी भारतीय हॉकी संघाने आशिया चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धा जिंकल्याने त्यांचे मानांकनातील स्थान वधारले. हॉकी फेडरेशनच्या मानांकनात तिसरे स्थान मिळवण्याची भारतीय हॉकी संघाची ही दुसरी खेप आहे.
विश्व हॉकी फेडरेशनच्या सांघिक मानांकनात नेदरलँड्स 3095.90 गुणासह पहिल्या, बेल्जियम 2917.87 गुणासह दुसऱ्या, भारत 2771.35 गुणासह तिसऱ्या तर इंग्लंड 2763.50 गुणासह चौथ्या स्थानावर आहे. 2021 साली भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक मिळवल्यानंतर सांघिक मानांकनात तिसरे स्थान मिळवले होते. तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये मिळालेले हे पहिले पदक होते. या मानांकनात मलेशिया नवव्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 11 वे तर पाकने 16 वे स्थान घेतले आहे.