महिलांमध्ये भारतीय संघ सहाव्या स्थानावर
वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) जाहीर केलेल्या ताज्या हॉकी मानांकनात भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारताने पुन्हा एकदा टॉप 3 मध्ये स्थान मिळविले असून मे 2022 मध्ये भारतीय संघाची घसरण झाली होती. भारताचे एकूण 2771 मानांकन गुण झाले आहेत. गेल्या महिन्यात चेन्नईत झालेलया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारत अपराजित राहिला होता, त्याचा क्रमवारीत बढती मिळण्यासाठी लाभ झाला आहे. त्या स्पर्धेत सातपैकी भारताने 6 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णीत राखला होता. इंग्लंडने 2745 गुण मिळविले असून युरो हॉकी स्पर्धा जिंकण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांना पहिल्या तीनमध्ये स्थान मिळू शकले नाही. युरो हॉकीच्या अंतिम लढती त्यांना नेरदलँड्सकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. युरो हॉकी स्पर्धेत इंग्लंडने चांगली कामगिरी केली. पण सुरुवातीला बेल्जियमकडून झालेला पराभव आणि भारताने केलेल्या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या क्रमवारीत नेदरलँड्सने 3113 गुणांसह अग्रस्थान कायम राखले असून युरो हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली, त्याआधी त्यांनी हॉकी प्रो लीग जेतेपद मिळविले आणि 2023 हॉकी वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक मिळविले. या शानदार कामिगरीमुळे नेदरलँड्सने बेल्जियमवर मोठी आघाडी घेतली असून बेल्जियम 2989 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनी (2689) पाचव्या, ऑस्ट्रेलिया (2544) सहाव्या, अर्जेन्टिना (2350) सातव्या, स्पेन (2347) आठव्या स्थानावर आहे.
महिला विभागात नेदरलँड्स 3422 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम असून त्याने विक्रमी 12 व्या वेळी युरोहॉकी चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया (2818), अर्जेन्टिना (2767) दुसऱ्या व तिसऱ्या, बेल्जियम (2609) चौथ्या, जर्मनी (2574) पाचव्या, भारत (2325) सहाव्या, स्पेन (2173), सातव्या, न्यूझीलंड (2001) आठव्या, जपान (1900) नवव्या व चीन (1894) दहाव्या स्थानावर आहे.