वृत्तसंस्था /बेंगळूर
चीनमधील हेंगझोयु येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गुरुवारी हॉकी इंडियाने भारतीय हॉकी पुरुष व महिला संघाची घोषणा केली. या स्पर्धेसाठी भारतीय संघातून अनुभवी स्ट्रायकर आकाशदीप सिंग आणि नवोदित कार्ती सेल्वम व जुगराज सिंग यांना वगळण्यात आले असून ललित उपाध्यायचे संघात पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाच्या निवड सदस्यांनी 18 जणांचा संघ जाहीर केला असून हरमनप्रित सिंगकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सविता करणार आहे. चेन्नई चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघातील आकाशदीप सिंग आणि कार्ति व जुगराज सिंग यांना वगळले आहे. पुरुष हॉकी संघाचे उपकर्णधारपद हार्दिक सिंगकडे राहिल. आता आशियाई स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या पुरुष हॉकी संघामध्ये जुगराज सिंगच्या जागी संजयचा तर आकाशदीप सिंग आणि कार्ती यांच्या जागी ललित उपाध्याय आणि अभिषेक यांना संधी देण्यात आली आहे. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेस व कृष्णन बहाद्दूर पाटक यांचाही संघात समावेश आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात बचावफळीतील 6 तर मध्य आणि आघाडीफळीतील प्रत्येकी 5 हॉकीपटूंची निवड करण्यात आली आहे.
महिलांच्या विभागात गोलरक्षक सविता पुनियाकडे संघाचे कर्णधारपद राहिल. दरम्यान अनुभवी सुशिला छानू, बलजित कौर आणि ज्योती छेत्री या तीन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. गेल्या महिन्यात जर्मनी आणि स्पेन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये तीन महिला हॉकीपटूंचा समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाचा अ गटात समावेश असून विद्यमान विजेता जपान, पाकिस्तान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझ्बेकिस्तान यांचा तर ब गटात कोरिया, मलेशिया, चीन, ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा सहभाग आहे. 2018 च्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने रौप्यपदक मिळवले होते. आता 2023 च्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून या गटात कोरिया, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर यांचा तर ब गटात विद्यमान विजेता जपान, यजमान चीन, थायलंड, कझाकस्तान व इंडोनेशिया यांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सलामीचा सामना 24 सप्टेंबर रोजी उझ्बेकबरोबर तर भारतीय महिला हॉकी संघाचा सामना सिंगापूरबरोबर 27 सप्टेंबरला होणार आहे.
पुरुष हॉकी संघ : पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाटक, वरुणकुमार, अमित रोहिदास, जर्मनप्रित सिंग, हरमनप्रित सिंग (कर्णधार), संजय, सुमित, निलकांत शर्मा, हार्दिक सिंग (उपकर्णधार), मनप्रित सिंग, विवेकसागर प्रसाद, समशेर सिंग, अभिषेक, गुरुजंत सिंग, मनदीप सिंग, सुखजित सिंग आणि ललितकुमार उपाध्याय.
महिला हॉकी संघ : सविता पुनिया (कर्णधार), के. बिचूदेवी, दीपिका, लालरेमसियामी, मोनिका, नवनीत कौर, नेहा, निशा, सोनिका, उदिता, इशिका चौधरी, दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), वंदना कटारिया, संगीत कुमारी, वैष्णवी फाळके, निकी प्रधान, सुशिला छानू आणि सलिमा टेटे.