वृत्तसंस्था/हांगझाऊ
चीनमध्ये सुरू झालेल्या 19 व्या 2023 सालातील हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघासमोर पेनल्टी कॉर्नरची समस्या भेडसावत आहे. दरम्यान या क्रीडा प्रकारात मंगळवारी भारताचा अ गटातील दुसरा सामना सिंगापूरबरोबर खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय हॉकी संघाने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याचा सराव खूप वेळ केला आहे.
या स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात भारताने उझ्बेकचा 16 गोलांनी दणदणीत पराभव केला होता. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली भारतीय हॉकी संघाने शनिवारच्या पहिल्या सामन्यात वेगवान आणि आक्रमक खेळावर अधिक भर दिला होता. या सामन्यात भारताला 14 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते आणि भारताने केवळ 5 कॉर्नरवर गोल नोंदविता आले. मंगळवारच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग खेळणार असून त्याच्यावर साहजिकच अधिक दडपण येऊ शकेल.
उझ्बेक विरुद्धच्या सामन्यात भारताने एकूण 16 गोल नोंदविले आणि त्यापैकी 10 मैदानी गोल नोंदविले गेले. हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग व विवेक सागर प्रसाद यांना या आगामी सामन्यासाठी पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करण्याकरिता योग्य मार्गदर्शन आणि सराव करावा लागेल. गोलरक्षक पी. आर. श्रीजेस व कृष्णन बहाद्दूर पाठक हे भारताचे भक्कम गोलरक्षक आहेत.