वृत्तसंस्था/ हाँगझोऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या अ गटातील पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारातील सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 10-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाचा पाकवरील हा विक्रमी विजय आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल नोंदविले.
हा सामना एकतर्फीच झाला. उभय संघातील हा 180 वा सामना होता. भारत-पाक हॉकीच्या इतिहासातील 8 गोलांच्या फरकाने भारताने मिळविलेला हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी म्हणजे 2017 साली भारताने पाकिस्तानचा 7-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. तसेच 1982 साली दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 7-1 असा मोठा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांनंतर केली आहे. 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आता पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारात भारताने अ गटात सलग 4 सामने जिंकून 12 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून या गटात भारताचा शेवटचा सामना बांगलादेशबरोबर 2 ऑक्टोबर रोजी होत आहे.
शनिवारच्या सामन्यात भारतातर्फे कर्णधार हरमनप्रीत सिंगने 11 व्या, 17 व्या, 33 व्या आणि 34 व्या मिनिटाला असे 4 गोल नोंदविले. वरुण कुमारने 41 व्या आणि 54 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. मनदीप सिंगने 8 व्या, सुमीतने 10 व्या, समशेर सिंगने 46 व्या आणि ललित कुमार उपाध्यायने 49 व्या मिनिटाला गोल नोंदिवले. पाकतर्फे मोहम्मद खानने 38 व्या तर अब्दुल राणाने 45 व्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने पाकवर 4-0 अशी आघाडी मिळविली होती.