वृत्तसंस्था/ बेंगळूर
ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघ शनिवारी इंग्लंडला रवाना झाला.
बर्मिंगहम राष्टकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघ सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल, अशी ग्वाही संघाचा कर्णधार मनप्रित सिंग इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या स्पर्धेत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात भारतालचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना या देशांचा सहभागही आहे. भारतीय हॉकी संघाच्या मोहिमेला रविवार 31 जुलै रोजी घानाविरुद्ध सामन्याने होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला काही दिवसापासून सराव शिबिर आयोजित केले होते. 2021-22 प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविण्यासाठी भारतीय हॉकी संघाला पेनल्टी कॉर्नर्सची संधी गमवून चालणार नाही. इंग्लंड, कॅनडा आणि वेल्स हे संघही दर्जेदार असल्याने भारतीय हॉकी संघाची या स्पर्धेत सत्वपरीक्षा ठरणार आहे.