वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बॅडमिंटन आशिया कनिष्ठ चॅम्पियनशिपसाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) भारताच्या कनिष्ठ संघाची घोषणा केली. ही खंडीय स्पर्धा इंडोनेशियातील योगयाकार्ता येथे 7 ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे. तारा शहा व आयुष शेट्टी या खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे.
तारा शहाने मुलींच्या एकेरी विभागात आपली क्षमता दाखवून दिली असून कौशल्यपूर्ण व निर्धारी खेळाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बीडब्ल्यूएफ मुलींच्या जागतिक मानांकनात ती 7 व्या स्थानावर असून यामुळे तिचे संघातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.
आयुष शेट्टीनेही मुलांच्या विभागात आपले स्थान निर्माण केले असून पुरुषांच्या जागतिक मानांकनात तो सध्या 20 व्या तर बीएआयच्या मानांकनात तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा अनुभव संघाला उपयुक्त ठरणारा असून सातत्यपूर्ण खेळामुळे तो संघासाठी जमेची बाजू ठरला आहे. लक्ष्य शर्मा व रक्षिता श्री एस. यांनीही चाचणीमध्ये पहिले स्थान मिळवित आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखविली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ते पदकाचे दावेदार आहेत. निवड झालेले खेळाडू विविध स्पर्धांत भारताचे वेगवेगळ्या गटात प्रतिनिधित्व करणार असल्याचे बीएआय सचिव संजय मिश्रा यांनी सांगितले.
भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघ : मुली-रक्षिता श्री एस. श्रीयांशी वालिशेट्टी, तारा शहा, अनमोल खर्ब. मुले दुहेरी-निकोलस नाथन राज व तुषार सुवीर आणि दिव्यम अरोरा व मयांक राणा. मुली दुहेरी-राधिका शर्मा व तन्वी शर्मा, कर्णिका श्री एस. व तनीशा सिंग. मिश्र दुहेरी-समरवीर व राधिका शर्मा, अरुलमुरुगन आर व श्रीनिधी.