टेबल टेनिसमध्ये भारताची विजयी सलामी, नौकानयनमध्ये बलराज पनवर अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ हांगझोयु
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या सांघिक टेबल टेनिस प्रकारात भारताने येमेनचा एकतर्फी तर महिला संघाने सिंगापूरचा 3-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. नौकानयन या प्रकारामध्ये भारताचा नौकानयनपटू बलराज पनवरने पुरुषांच्या सिंगल स्कल्स प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने चिनी तैपेईचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारताने द. कोरियाच्या पराभव केला होता. शुक्रवारच्या समन्यात भारताने चिनी तैपेईवर 25-22, 25-22, 25-21 अशी मात केली. हा सामना 85 मिनिटे चालला होता. रविवारी भारताचा सामना जपान किंवा कझाकस्तान यांच्याबरोबर होईल.
चिनी तैपेईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सेटमधील सुरुवातीला भारत 6-10 असा पिछाडीवर होता पण त्यानंतर भारताने चिनी तैपेईशी 21-21 अशी बरोबरी साधली. वर्गिस आणि राय यांनी शेवटचे दोन गुण मिळवत भारताला हा सेट जिंकून दिला. दुसऱ्या सेटमध्ये तैपेईकडून कडवा प्रतिकार झाला. एकवेळी सामन्याची स्थिती 17-17 अशी बरोबरीत होती. त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात भारताने महत्त्वाचे गुण घेत दुसरा सेट तीन गुणांच्या फरकाने जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये भारताच्या खेळाडूंनी परतीचे फटके अचूकपणे मारत तैपेईचे आव्हान संपुष्टात आणले. पाकिस्तान संघानेही तैपेईचा यापूर्वीच्या सामन्यात 3-0 अशा सेट्समध्ये पराभव केला होता. सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्हाला हा सामना जिंकता आला, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विनितने दिली.
टेबल टेनिस या प्रकारात पुरुषांच्या सांघिक लढतीत भारताने येमेनचा 3-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनुभवी शरथ कमल, जी. साथीयान आणि हरमित देसाई यांना येमेनवर विजय मिळवण्यात फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. पहिल्या सामन्यात जी. साथीयानने येमेनच्या अली ओमर अहमदचा 11-3, 11-2, 11-6 अशा गेम्समध्ये केवळ 14 मिनिटात पराभव केला. 41 वर्षीय शरथची ही शेवटची आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात शरथ कमलने येमेनच्या इब्राहिम गुब्रानचा 11-3, 11-4, 11-6 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. तिसऱ्या सामन्यात हरमित देसाईने येमेनच्या मगाद अहमद अली अलदुबनीचा 11-1, 11-1, 11-7 असा पराभव करत येमेनचे आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱ्या लढतीत भारतीय पुरुष संघाने सिंगापूरवर 3-1 अशी मात केली. जी. साथियान, हरमीत देसाई यांनी आपापले सामने जिंकून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण तिसऱ्या सामन्यात शरथ कमल पराभूत झाल्याने सिंगापूरला आशा निर्माण झाली होती. मात्र साथियानने चौथा सामना जिंकून भारताचा विजय साकार केला. भारताचा पुढील सामना ताजिकिस्तानशी होईल.
महिलांमध्ये भारताने सिंगापूरवर 3-2 असा निसटता विजय मिळविला.. मनिका बात्रा, श्रीजा अकुलाने एकेक सामना जिंकला तर ऐहिका मुखर्जीने एक सामना गमविल्यानंतर निर्णायक सामन्यात विजय मिळविला.
नौकानयन या प्रकारात भारताचा नौकानयनपटू बलराज पनवारने पुरुषांच्या सिंगल स्कुल्समध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 24 वर्षीय पनवारने एफए/बी2 उपांत्य फेरीत तिसरे स्थान मिळवताना 7 मिनिटे 22.22 सेकंदाचा अवधी घेतला. नौकानयन या क्रीडा प्रकारामध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागात विविध क्रीडा प्रकार घेतले जात आहेत.