वृत्तसंस्था/ मल्लपुरम (तामिळनाडू)
येथे सुरू असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारताच्या महिला अ संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. भारतीय महिला बुद्धिबळ संघाने आपला सलग सातवा विजय नोंदविला. महिलांच्या विभागातील गुणतक्त्यात भारतीय महिला अ संघाने 14 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले.
या स्पर्धेमध्ये भारतीय महिला अ संघाने अद्याप एकही पराभव पत्करलेला नाही. शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताने सहाव्या मानांकित अझहरबेजानचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव केला. या लढतीतील पहिल्या डावात भारताच्या कोनेरु हंपीला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारत अ महिला संघातील तानिया सचदेव आणि आर. वैशाली यांनी दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आर. वैशालीने 44 व्या चालीत प्रतिस्पर्ध्यावर मात केली. या लढतीमध्ये भारताच्या हरिका द्रोणावली, वैशाली आणि तानिया सचदेव यांनी दडपणाखाली आपले विजय नोंदविले.
या स्पर्धेत खुल्या गटात भारत अ संघाने भारत क संघाचा 3-1 अशा गुणांनी पराभव केला. या लढतीमध्ये अर्जुन इरिगेसीने अभिजित गुप्ताचा तर दुसऱया डावात एस. एल. नारायणनने अभिमनी पुराणिकचा पराभव करून पूर्ण गुण वसूल केले. हरिकृष्णा आणि सूर्यशेखर गांगुली यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.
या स्पर्धेत सहाव्या फेरीत भारत ब संघाला आर्मेनियाकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर भारत ब संघाने क्युबावर 3.5-0.5 अशा गुणांनी विजय मिळविला. भारत ब संघातील डी. गुकेशने या स्पर्धेतील आपला सलग सातवा विजय मिळविला. निहाल सरीन तसेच आर. प्रग्यानंद यांनी आपले डाव जिंकले. अदिबनला प्रतिस्पर्ध्याने बरोबरीत रोखले. या स्पर्धेमध्ये सहाव्या फेरीत धक्कादायक निकाल पहावयास मिळाला. आर्मेनियाने बलाढय़ अमेरिकेला 2-2 असे बरोबरीत रोखून स्पर्धेच्या गुणतक्त्यात 13 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या गुणतक्त्यात भारत अ, भारत ब, अमेरिका, उझ्बेकिस्थान यांनी प्रत्येकी 12 गुण नोंदविले आहेत. महिलांच्या विभागात भारत ब संघाला ग्रीसकडून हार पत्करावी लागली. ग्रीसने भारत ब महिला संघाचा 2.5-1.5 असा पराभव केला. या लढतीमध्ये भारत ब संघातील दिव्या देशमुखने विजय नोंदविला. तर वंटिका अगरवाल आणि सौम्या स्वामीनाथन यांना आपले डाव गमवावे लागले. मेरी ऍन गोम्सला प्रतिस्पर्धीने बरोबरीत रोखले. भारताच्या महिला क संघाने स्वीसचा 3-1 अशा गुणांनी पराभव केला.