वृत्तसंस्था/ चेस्टर ली स्ट्रीट
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर असून उभय संघामध्ये टी-20 मालिका खेळविली जात आहे. शनिवारी रात्री येथे खेळविण्यात आलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला.
या पहिल्या सामन्यात इंग्लंडची कर्णधार ऍमी जोन्स नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 7 बाद 132 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 13 षटकात 1 बाद 134 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी एकतर्फी जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दर्जाहीन झाली.
भारताच्या डावामध्ये दीप्ती शर्माने 24 चेंडूत 3 चौकारासह 29, स्मृती मानधनाने 20 चेंडूत 4 चौकारासह 23, कर्णधार हरमनप्रीत कौरने 15 चेंडूत 3 चौकारासह 20, रिचा घोषने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, शफाली वर्माने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे सामनावीर सारा ग्लेनने 23 धावात 4 तर डेव्हिस आणि स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीच्या सोफिया डंक्लेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने हा सामना केवळ 13 षटकातच संपविला. डंक्ले आणि वेट या सलामीच्या जोडीने 6.2 षटकात 60 धावांची भागीदारी केली. वेटने 16 चेंडूत 3 चौकारासह 24 धावा जमविल्या. वेट बाद झाल्यानंतर डंक्ले आणि कॅप्सी या जोडीने 6.4 षटकात अभेद्य 74 धावांची भागीदारी करून विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. डंक्लेने 44 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 61, कॅप्सेने 20 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 32 धावा झळकविल्या. इंग्लंडला अवांतराच्या रुपात 17 धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे स्नेह राणाने 31 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकात 7 बाद 132 (दीप्ती शर्मा नाबाद 29, स्मृती मंदाना 23, रिचा घोष 16, हरमनप्रीत कौर 20, शफाली वर्मा 14, हेमलता 10, ग्लेन 4-23, डेव्हिस 1-24, स्मिथ 1-10), इंग्लंड 13 षटकात 1 बाद 134 (डंक्ले नाबाद 61, कॅप्से नाबाद 32, वेट 24, स्नेह राणा 1-31).