वृत्तसंस्था/ हांगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचे लक्ष सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर राहिल. महिलांच्या हॉकी क्रीडा प्रकाराला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना दुबळ्या सिंगापूर बरोबर होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सांघिक मानांकनात सध्या भारतीय महिला संघ सातव्या स्थानावर आहे. दरम्यान आशियाई स्पर्धेत भारताला मानांकनात टॉप सिडिंग मिळाले असून त्यानी या मानांकनात दहावा मानांकन आणि विद्यमान विजेता जपानला मागे टाकले आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ या स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा अ गटात समावेश असून त्यांचा सलामीचा सामना बुधवारी सिंगापूर होत आहे.
मानांकन आणि फॉर्म पाहिला तर भारतीय महिला हॉकी संघाकडे या स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी फेव्हरीट म्हणून पाहिले जाते. 4 वर्षापूर्वी झालेल्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला कास्यपदक थोडक्यात गमवावे लागले होते आणि त्यांना चैथे स्थान मिळाले होते. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली असून या संघाला स्कोपमन हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. सध्या चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले तर त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेशाचे तिकीट मिळेल.
या स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश असून सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, आणि कोरिया यांचा सहभाग आहे. ब गटात चीन, जपान, इंडोनेशिया, कझाकस्तान व थायलंड यांचा समावेश आहे. कर्णधार सविता पुनिया, बिच्चू देवी, खेरीबाम, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का, सुशिला छानू, निक्की प्रधान लालरेमीसियामी,नवनीत कौर, वंदना कटारिया, उदिता, संगीता कुमारी, नेहा, निशा, सलिमा टेटे आणि इशिका चौधरी यांच्या कामगिरीवरच भारतीय महिला संघाचे यश अवलंबून आहे. सिंगापूरबरोबर भारताचा सलामीचा सामना बुधवारी झाल्यानंतर भारताचा दुसरा सामना मलेशियाबरोबर 29 सप्टेंबरला, कोरियाबरोबर 1 ऑक्टोबरला तर हाँगकाँगबरोबर 3 ऑक्टोबरला होणार आहे. 2014 नंतर भारत आणि सिंगापूर महिला संघामध्ये आतपर्यंत तीन सामने झाले असून ते सर्व सामने भारताने जिंकले आहे.