वृत्तसंस्था/ बेंगळूर
11 ते 17 डिसेंबर दरम्यान स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे होणाऱया 2022 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ शनिवारी उशिरा स्पेनला रवाना झाला.
2023-24 च्या महिलांच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेसाठी स्पेनमधील नेशन्स लिग हॉकी स्पर्धा सर्वच संघाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. या स्पर्धेसाठी सविताच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांचा संघ निवडण्यात आला. या स्पर्धेत भारतीय महिला संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास संघाची कर्णधार सविताने व्यक्त केला आहे. स्पेनमध्ये होणाऱया या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. ब गटामध्ये कॅनडा, जपान, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा सहभाग आहे. तर अ गटामध्ये आयर्लंड, इटली, कोरिया आणि स्पेन यांचा समावेश आहे. दीप ग्रेस एक्काकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.