आज तिसरा व शेवटचा एकदिवसीय सामना, महत्त्वाच्या भारतीय खेळाडूंचे पुनरागमन,
वृत्तसंस्था/ राजकोट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज बुधवारी येथे होणार असून यावेळी कर्णधार रोहित शर्माची नजर भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीचा परिपूर्ण कळस गाठताना दुर्मिळ ‘क्लीन स्वीप’ साधण्यावर असेल. याआधीचा इतिहास पाहिल्यास भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकांत ‘व्हाईटवॉश’ साध्य करता आलेला नाही. किंबहुना, मालिकेत कितीही सामन्यांचा समावेश असला, तरी मायदेशात किंवा बाहेर, असा निकाल दोन्ही संघांना नोंदविता आलेला नाही.
विश्वचषकाच्या यजमानांसाठी त्या स्पर्धेपूर्वी सर्व गोष्टी ज्या प्रकारे अनुकूल पद्धतीने घडल्या आहेत त्याकड पाहता मालिकेत 3-0 असा निकाल साधणे त्यांना अगदीच कठीण जाऊ नये. आघाडीच्या खेळाडूंची अनुपस्थिती असूनही आणि प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळावी यासाठी संघरचना सतत बदलूनही विश्वचषकापूर्वी सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद करण्याच्या दृष्टीने भारताला उत्तम संधी आहे. जर त्यांनी 3-0 असा विजय मिळवला, तर 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे विश्वचषकातील सलामीची लढत खेळण्यासाठी जेव्हा दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील तेव्हा पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे पारडे निश्चितच जड असेल.
दोन्ही संघांनी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी बरेच बदल केलेले असून ज्यांना सहसा संघात स्थान मिळू शकत नव्हते त्यांनाही त्यामुळे संधी प्राप्त झालेली आहे. तरीही भारताने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पुरते चीत केले. तथापि, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आजच्या सामन्यात थोडा दिलासा मिळू शकतो. कारण भारताने शार्दुल ठाकूरसह पहिल्या दोन सामन्यात 74 आणि 104 धावा केलेल्या शुभमन गिलला विश्रांती दिली आहे. यंदा एकदिवसीय सामन्यांत एक हजार धावा जमविणारा गिल हा एकमेव फलंदाज असून 72.35 च्या सरासरीने त्याने 1,230 धावा काढलेल्या आहेत. अंतिम सामन्यात त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर हे घरी परतले असल्याचे रोहितने नंतर सांगितले.
पण भारताचे फलंदाजीतील मुख्य आधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे त्याचप्रमाणे फॉर्ममध्ये असलेल्या कुलदीप यादवचेही थोड्या विश्रांतीनंतर आज पुनरागमन अपेक्षित आहे. महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलने संघाचे प्रशंसनीय पद्धतीने नेतृत्व केलेले आहे. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा संघाने आशिया चषक मोहिमेला सुऊवात केली होती तेव्हा भारतासमोर भरपूर समस्या होत्या. पण इशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी या संघाचे रूपांतर एका मजबूत संघात केले आहे.
पाठीच्या दुखापतीशी संबंधित समस्यांमुळे श्रेयस अय्यरला संघर्ष करावा लागलेला असला, तरी त्याने इंदूरमध्ये शतक केल्याने मधल्या फळीतील त्याचे स्थान मजबूत होईल. राहुलनेही योग्य वेळी फलंदाजी आणि यष्टिरक्षणात चमक दाखविलेली आहे. राहुलप्रमाणेच जसप्रीत बुमराहनेही आपली तंदुरुस्ती आणि फॉर्म सिद्ध केलेला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर भारताचा हा प्रमुख गोलंदाज निवडीसाठी उपलब्ध झालेला आहे. जरी संघ व्यवस्थापन दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या बाजूने झुकलेले दिसत असले, तरी रविचंद्रन अश्विनला विश्वचषक स्पर्धेसाठी या अंतिम संधीचा फायदा घेणे निश्चितच आवडेल.
ऑस्ट्रेलिया भारतामध्ये एकदिवसीय सामन्यांत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागांत फ्लॉप झाल्याचे कधी सहसा पाहायला मिळालेले नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये लागोपाठ पाच पराभवानंतर आता स्वत:ला सावरणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे बनले आहे. काही महिन्यांपूर्वी याच संघाने मिचेल स्टार्कच्या अचूक इन-स्विंगर्सच्या साहाय्याने भारताचा 2-1 असा पराभव केला होता. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी एक शेवटचा सामना शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला आज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यसह पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजांना वापरण्याचा मोह अनावर होऊ शकतो. फलंदाजीमध्ये ट्रॅव्हिस हेडची अनपुस्थिती त्यांना जाणवत असून स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे दोघेही भारतात चमकू शकलेले नाहीत.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया-पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, स्पेन्सर जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा.
सामन्याची वेळ-दुपारी 1.30 वा.