वृत्तसंस्था/ हांगझाऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोमवारी 9 व्या दिवशी कुराश, अश्वदौड, कॅनोइंग आणि कायकिंग तसेच महिलांची बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांकडून निराशा झाली. कुराश प्रकारात भारताच्या ज्योती टोकास आणि यशकुमार चौहान यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. तर अश्वदौडमधील सांघिक जम्पिंग आणि वैयक्तिक या दोन्ही प्रकारात भारताला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॅनोइंग आणि कायकिंग या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांची निराशा झाली. महिलांच्या बॉस्केटबॉलमध्ये भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
कुराश या क्रीडा प्रकारात भारताच्या ज्योती टोकास आणि यशकुमार चौहान यांना सोमवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एकतर्फी हार पत्करावी लागली. त्यामुळे या क्रीडा प्रकारात भारताला पदकविना परतावे लागत आहे. पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात इराणच्या सादेग अझरांगने भारताच्या यशकुमार चौहानचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. तर महिलांच्या 47 किलो वजन गटातील विभागात इराणच्या मेलिका ओमिद व्हँडचेलीने भारताच्या ज्योती टोकासचा 3-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत कुराशमध्ये रोप्यपदक मिळविणाऱ्या भारताच्या पिंकी बलहेराला 52 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तसेच पुरुषांच्या 81 किलो वजन गटात भारताच्या डी. आदित्यला, महिलांच्या 52 किलो गटात सुचिका तारियाळला आणि पुरुषांच्या 66 किलो गटात केशवला प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2018 च्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात 2 पदकांची कमाई केली होती.
भारत शेटवच्या स्थानी
अश्वदौड या क्रीडा प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक जम्पिंगच्या अंतिम लढतीत भारतीय स्पर्धकांना निराशा पत्करावी लागली. त्यामुळे भारताला आता या क्रीडा प्रकारात पदकविना रहावे लागले. सांघिक जम्पिंग, अश्वदौड प्रकारात भारतीय संघाला 5 व्या आणि शेवटच्या स्थानावर रहावे लागले. या क्रीडा प्रकारात चीनने सुवर्ण, जपानने रौप्य तर थायलंडने कांस्यपदक मिळविले. भारताच्या विकासकुमार, अपूर्वा दाभाडे आणि आशिष लिमये यांनी या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
भारताच्या पदरी निराशा
कॅनोइंग आणि कायकिंग या क्रीडा प्रकारात सोमवारी भारताच्या एकाही स्पर्धकाला पदक मिळविता आले नाही. या क्रीडा प्रकारातील झालेल्या 4 विविध अंतिम फेऱ्यांमध्ये भारतीय स्पर्धकांना पिछाडीवर रहावे लागले. पुरुषांच्या सिंगल कॅनोइ 1000 मी. प्रकारात निरज वर्माला 7 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या कॅनोइ डबल 500 मी. अंतिम फेरीत भारताच्या रिबासन सिंग तसेच ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडून चांगली कामगिरी न झाल्याने भारतीय पुरुष संघाला 8 वे स्थान मिळाले. कायकिंग डबल 500 मी. तसेच कॅनोइ डबल 500 मी. प्रकारातील अंतिम फेरीमध्ये भारतीय महिला संघाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावले लागले.
महिला बास्केटबॉल
महिलांच्या बास्केटबॉल प्रकारात भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. सोमवारी येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर कोरीयाने भारताचा 96-57 अशा गुणानी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तत्पुर्वी या क्रीडा प्रकारात भारतीय महिला बास्केटबॉल संघाने अ गटात दुसरे स्थान मिळविले होते. भारताने इंडोनेशियाचा 66-46, मंगोलियाचा 68-62 असा पराभवल केला होता. त्यानंतरच्या सामन्यान विद्यामान विजेत्या चीनने भारतावर 111-53 अशी मात केली होती. आता उत्तर कोरीया आणि चीन यांच्यात मंगळवारी उपांत्य सामना होईल.
भारताचे आव्हान जिवंत
क्वेड्रंट सिपेकटेकरॉ या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघाने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. भारतीय पुरुष संघाने ब गटातील 2 सामने जिंकले आहेत. मात्र भारतीय महिला संघाचे या क्रीडा प्रकारातील आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय पुरुष संघाने पहिल्या सामन्यात फिलिपिन्सचा 2-0 तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 2-0 असा पराभव केला. आता भारताचा पुढील सामना मंगळवारी दक्षिण कोरीया बरोबर होईल. महिलांच्या विभागात भारताचे आव्हान प्राथमिक गटाच्या फेरीतच समाप्त झाले. भारतीय महिला संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लाओसने भारताचा 2-0 तसेच त्यानंतर चीनने भारताचा 2-0 असा पराभव केला.