वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप : वर्ल्ड चॅम्पियन ऑलिव्हियाला पराभवाचा धक्का, अन्य भारतीय महिला प्रारंभीच पराभूत
वृत्तसंस्था/ बेलग्रेड, सर्बिया
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अंतिम पांघलने विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन अमेरिकेच्या ऑलिव्हिया डॉमिनिक पॅरिशचा धक्कादायक पराभव करीत पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. अन्य भारतीयांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
णहिलांच्या 53 किलो गटाच्या या लढतीच्या सुरुवातीला पांघल 0-2 अशी पिछाडीवर पडली होती. पण नंतर मुसंडी मारत पांघलने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली. ऑलिव्हियाने सुरुवातीला पांघच्या उजव्या पायावर आक्रमक करीत तिला खाली पाडले. पण 19 वर्षीय पांघल याने अजिबात विचलीत न होता नंतरच्या फेरीत सावध खेळ करीत ऑलिव्हियाला पुन्हा तशी मिळणार नाही, याची दक्षता घेत तिला अखेरपर्यंत गुण मिळू दिले नाहीत. दुसऱ्या राऊंडमध्ये भक्कम बचाव कायम ठेवत ऑलिव्हियाला आक्रमण करण्याची संधीच दिली नाही. पांघलाने ऑलिव्हियाचा डावा पकडून तिने तिला खाली घेत गुणांची बरोबरी साधली. पांघलने लेग लेस मारण्याचा प्रयत्न केला. पण ही चाल तिला यशस्वीरीत्या करता आली नाही. बराच काळ हालचाल न केल्यामुळे ऑलिव्हियाने एक गुण गमविला. उभ्यानेच दोघांत नंतर लढत झाली आणि पांघलने एका गुणाची आघाडी राखत लढत जिंकली.
दुसऱ्या फेरीत पांघलने पोलंडच्या रुकसाना मार्टा झसिनाला तांत्रिक सरसतेच्या आधारे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पांघलने केवळ एक मिनिट 38 सेकंदात ही लढत संपवली.
मनीषा (62 किलो), प्रियांका (68 किलो), ज्योती ब्रेवाल (72 किलो) यांना आपापल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पण त्यांना पराभूत करणाऱ्या खेळाडूंच्या पुढील लढतींच्या निकालाची त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुरुषांच्या सर्व दहाही मल्लांना पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने त्यांना ऑलिम्पिक कोटा किंवा पदक मिळविता आले नाही.
त्याआधी मंगळवारी उशिरा झालेल्या महिलांच्या सामन्यात भारताच्या नेहा शर्माला कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीच्या अॅनास्तेशिया ब्लेवसकडून पराभव पत्करावा लागला. ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या 55 किलो वजन गटात रिपेचेज लढतीत युक्रेनच्या मारीया व्हीनीकचा 7-4 असा पराभव करून कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले होते. कांस्यपदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत 19 व्या मानांकित नेहाने 16 व्या मानांकित अॅनास्तेशियाला जोरदार लढत दिली. पण तांत्रिक गुण गमविल्याने तिला पराभूत व्हावे लागले.
सरिता मोर व दिव्या काकरन या अन्य भारतीय महिलांना प्राथमिक फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. सरिता (57 किलो), दिव्या (76 किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या तर अंतिम कुंडू (65 किलो) व नीलम (50 किलो) यांनाही याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांचे प्रतिस्पर्धीही पुढे पराभूत झाल्याने रिपेचेज फेरीत खेळण्याची त्यांची संधीही हुकली.
भारतीय कुस्ती फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय फेडरेशनने निलंबन केले असल्याने भारतीय खेळाडू या स्पर्धेत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ध्वजाखाली खेळत आहेत.