आग्वाद किल्ल्यावर तीन दिवस कार्यक्रम : केंद्रीयमंत्री सर्वानंद सोनोवाल उद्घाटक,देशभरातील 75 दीपगृहांचे भाग्य फळफळणार
पणजी : भारताचा पहिला ‘लाईट हाऊस फेस्टिव्हल’ आजपासून गोव्यात सुरु होत असून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाठी उद्घाटक म्हणून येत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव आग्वाद किल्ल्यावरील लाईट हाऊस म्हणजेच दीपगृहामध्ये होणार आहे. देशातील समुद्रकिनारी असलेल्या 75 दीपगृहांचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यानंतर ही दीपगृहे पर्यटनस्थळांमध्ये रुपांतरीत होतील. पर्यटनासाठी दीपगृहे आकर्षण ठरणार आहेत. देशातील महत्वाची अशी 75 दीपगृहे शोधून काढण्यात आली असून त्यांचे पूणत: नूतनीकरण केले जाणार आहे. युरोप आणि अमेरिकेच्या धर्तीवर या दीपगृहांचा विकास केला जाईल. पर्यटकांसाठी ही दीपगृहे म्हणजे खास आकर्षण बनणार आहे.
आग्वाद किल्ल्यावर आयोजन
केंद्रीय बंदर, जहाज व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या केंद्रीय बंदर व जहाज मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन गोव्यात केले आहे. हा महोत्सव तीन दिवस चालणार असून आज शनिवार दि. 23 रोजी दु. 2.30 वा. सर्वानंद सोनोवाल व डॉ. प्रमोद सावंत हे कार्यक्रमास प्रारंभ करतील.
किनारे, दीपगृहांवर परिसंवाद
‘आपले समुद्रकिनारे आणि दीपगृहे’ या विषयावरच्या परिसंवादाचे आयोजन महोत्सवात करण्यात आले आहे. नामवंत वास्तुशास्त्रज्ञ प्रो. वसंत शिंदे हे या कार्यक्रमात सहभागी होतील. देशातील दीपगृहांचा इतिहास आणि त्यांची वैशिष्टे याविषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. सुनिल गुप्ता, जे प्रधानमंत्री संग्रहालयाचे विशेष अधिकारी आहेत, त्याचबरोबर गोवा राज्य वस्तुसंग्रहालय संचालक वासु उसपकर सहभागी होतील. ‘भारत प्रवाह’ या देशातील जलमार्ग, बंदरे, जहाजोद्योग याकडे संलग्न असलेल्या उपक्रमाचे आयोजनही या महोत्सवात करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींची इच्छा
या महोत्सवात विविध स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरिटेज पर्यटन अंतर्गत देशातील दीपगृहांचा समावेश पर्यटन क्षेत्रासाठी व्हावा, अशी इच्छा 2021 मधील ‘मन की बात’ मध्ये मांडली होती. गोव्यातील या कार्यक्रमातंर्गत केंद्रीयमंत्री सोनोवल हे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांबरोबर रोडशोमध्ये सहभागी होतील. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. नामवंत गायक ‘शान’ यांच्या संगीताचा कार्यक्रमही आग्वाद किल्ल्यावर होणार आहे.
सुदेश, हेमा यांचे संगीत कार्यक्रम
गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि 24 रोजी सुदेश भोसले यांच्या गायनाचा, तर दि. 25 रोजी हेमा सरदेसाई यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. संपूर्ण तीन दिवसांच्या या महोत्सवाचा समारोप 25 रोजी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच केंद्रीय बंदर व जहाज राज्यमंत्री शंतनु ठाकूर हे या कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत.