पाकिस्तानला हरवून पुरुष संघाने जिंकले सुवर्ण : टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत रोहन-ऋतुजाची सुवर्णमय कामगिरी
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी स्क्वॅशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक सुवर्णपदक प्राप्त केले. विशेष म्हणजे, 2014 नंतर प्रथमच भारताने स्क्वॅशमध्ये पदक जिंकले आहे. टेनिसमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात अनुभवी रोहन बोपन्ना व ऋतुजा भोसले यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. याशिवाय, 10 मी एअर पिस्तूल मिश्र प्रकारात दिव्या-सरबजोत जोडीने रौप्यपदक पटकावले. तसेच 10 हजार मी शर्यतीत भारताच्या कार्तिकने रौप्य तर गुलवीरने कांस्यपदक जिंकले. पदकतालिकेत आता भारत 10 सुवर्ण, 14 रौप्य व 14 कांस्यपदकासह एकूण 38 पदके मिळवत चौथ्या स्थानावर आहे.
शनिवारी आशियाई स्पर्धेतील सातवा दिवस भारतासाठी लकी ठरला. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने सलामीचा सामना जिंकला होता. त्यानंतर सौरव घोषालने जबरदस्त कामगिरी करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अभय सिंगने पाकिस्तानी खेळाडूचा पराभव करत भारताला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, 2014 नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये हे पदक जिंकले आहे. यापूर्वी, 2014 मध्ये मलेशियाला नमवत भारताने सुवर्ण जिंकण्याची किमया केली होती.
पहिल्या सामन्यात भारताच्या महेश माणगावकरला पाकच्या नसीरने 11-8, 11-3, 11-2 असे नमवत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र, भारताचा अनुभवी खेळाडू सौरव घोषालने शानदार प्रदर्शन करताना पाकच्या आसीम खानला 11-5, 11-1, 11-3 असे पराभूत करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यानंतर तिसऱ्या व निर्णायक सामन्यात भारताचा अभय सिंग व पाकचा नूर झमान आमनेसामने होते. दोन्ही खेळाडूंत चांगलीच टक्कर पहायला मिळाली. पण, मोक्याच्या क्षणी अभय सिंगने आपला खेळ उंचावत हा सामना 11-7, 9-11, 7-11, 11-9, 12-10 असा पराभव केला आणि देशाला ऐतिहासिक असे सुवर्ण जिंकून दिले. भारताच्या या सुवर्णपदकाचा हिरो ठरला तो चेन्नईचा अभय सिंग. ज्याने निर्णायक लढतीत संयम दाखवला आणि नूरचा पराभव करत विजय मिळवला. विजयानंतर अभयने रॅकेट हवेत फेकले आणि जल्लोष केला. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून फक्त सुवर्णपदक जिंकेल नाही तर साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा देखील बदला घेतला.
रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीला सुवर्ण
दरम्यान, शनिवारी भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला.
पहिल्या सेटमध्ये भारताच्या ऋतुजा आणि रोहन यांना पराभव पत्करावा लागला होता. पण या दोघांनी हार मानली नाही. या दोघांनी दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि हा सेट 6-3 असा जिंकला. त्यानंतर तिसरा सेट हा निर्णायक होता. पण दुसऱ्या सेटनंतर ऋतुजा आणि रोहन यांच्या खेळात चांगली आक्रमकता आली होती. या गोष्टीचा फायदा त्यांना तिसऱ्या सेटमध्ये झाला. ऋतुजा आणि रोहन यांनी तिसरा सेट 10-4 असा जिंकत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, रोहन बोपण्णा आता दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ठरला आहे. त्याने 2018 मध्ये दिविज शरणसह पुरुष दुहेरी जिंकली होती आणि आता ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.
10 मी एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य
तत्पूर्वी, भारताने एशियन गेम्सच्या सातव्या दिवसाची रौप्यपदकाने सुरुवात केली. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी संघाने रौप्य पदक पटकावून दिले. या संघात सरबजोत सिंग आणि दिव्या यांचा समावेश होता. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय जोडीला चीनच्या झांग बोवेन आणि जियांग रॅनक्सिन यांच्याविरुद्ध 14-16 असा पराभव स्वीकारावा लागला. चीनने सुवर्ण, भारताने रौप्य तर कोरियाने कांस्य जिंकले.
टेबल टेनिसमध्ये भारताचे पदक पक्के
स्क्वॅश, टेनिसमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर शुक्रवारी टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीत भारताने ऐतिहासिक कामगिरी साकारली. सुतिर्था व अहिका मुखर्जी या भगिनींनी भारताला पहिले महिला दुहेरीचे आशियाई पदक निश्चित करुन दिले. यापूर्वी एकदाही भारताला टेबल टेनिसमध्ये यश मिळवता आलेले नाही. पण, सुतिर्था व अहिका यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या अव्वल मानांकित वँग यिदी व चेन मँग यांचा पराभव केला. भारतीय जोडीने 11-5, 11-5, 5-11, 11-9 अशा फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे.
बॉक्सर लोव्हलिना उपांत्य फेरीत
भारताची स्टार महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने (75 किलो) उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व लढतीत लोव्हलिनाने कोरियन बॉक्सरचा 5-0 ने पराभव केला. या विजयासह तिने आपले पदकही निश्चित केले आहे. तसेच पुरुष गटात भारतीय हेवीवेट स्टार नरेंद्र बेरवालने इराणच्या इमान रमदानपुरदेलावरचा पराभव करून पुरुषांच्या 92 किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्याच्या पदकावर शिक्कामोर्तब केले. 92 किलो मध्ये फक्त दोन कोटा उपलब्ध आहेत, त्यामुळे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान बुक करण्यासाठी त्याला अंतिम फेरी गाठावी लागेल.
वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून निराशा
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो गटात सर्वांना निराश केले आहे. स्नॅचमध्ये तिला फक्त 83 किलो वजन उचलता आले. तिला दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात 86 किलो वजन उचलता आले नाही. तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात 111 किलो वजन उचलले. यामुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अॅथलेटिक्समध्ये भारताला दोन पदके
अॅथलेटिक्समध्येही भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त अशी कामगिरी केली. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या 10 हजार मी शर्यतीत भारताच्या कार्तिकने 28:15:38 सेंकद वेळ नोंदवत रौप्यपदकाला गवसणी घातली तर भारताच्याच गुलवीरने 28:17:21 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. बहरीनच्या बेल्यूने 28:13:62 सेकंदासह सुवर्णपदक जिंकले. शेवटच्या टप्प्यात कार्तिक थोडासा मागे पडल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, अॅथलेटिक्समधील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.
सातव्या दिवशी भारताने मिळवलेली पदके
- स्क्वॅश- भारतीय पुरुष संघाला सुवर्णपदक
- मिश्र दुहेरी टेनिस – रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले सुवर्ण
- 10 मी एअर पिस्तूल सांघिक – सरबजोत-दिव्या, रौप्यपदक
- 10 हजार मी शर्यत – कार्तिक आणि गुलवीर, रौप्य व कांस्यपदक.