‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे प्रतिपादन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बातच्या 104 व्या भागात संबोधित केले. यावेळी त्यांनी जी-20 शिखर परिषदेच्या यजमानपदाचाही उल्लेख केला. भारत जी-20 शिखर परिषदेचे यजमानपदासाठी पूर्णपणे तयार असून सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमातून भारताची ताकद आणि कार्यक्षमता संपूर्ण जगाला दिसेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सप्टेंबर महिना भारताच्या क्षमतेचा साक्षीदार असणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जी-20 लीडर्स समिटसाठी भारत पूर्णपणे तयार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 40 देशांचे प्रमुख आणि अनेक जागतिक संस्था राजधानी दिल्लीत येत आहेत. जी-20 शिखर परिषदेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल, असे पंतप्रधान म्हणाले. जी-20 शिखर परिषद राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 9-10 सप्टेंबर रोजी प्रगती मैदानावरील अत्याधुनिक भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. यामध्ये जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत.
जी-20 शिखर परिषदेच्या इतिहासात भारताला एक अनोखी संधी प्राप्त झालेली आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने जी-20 ला अधिक समावेशक व्यासपीठ बनवले आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ शिखर परिषदेमध्ये सामील होत असल्यामुळे आफ्रिकेतील लोकांचा आवाज जगाच्या या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.
60 शहरांमध्ये 200 सभांचे आयोजन
गेल्यावषी बाली येथे भारताने जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून देशभरात विविध कार्यक्रम करण्यात आल्याचा आम्हाला अभिमान आहे. दिल्लीतील मोठ्या कार्यक्रमांच्या परंपरेपासून दूर जात आम्ही देशातील विविध शहरांपर्यंत कार्यविस्तार वाढवला. देशातील 60 शहरांमध्ये यासंबंधी सुमारे 200 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. जी-20 चे प्रतिनिधी जेथे गेले तेथे लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, असेही मोदी म्हणाले. या सभांसाठी जी-20 मध्ये आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीलाही आपल्या देशातील कलात्मक विविधता पाहून आश्चर्य वाटले. परिणामत: ‘व्होकल फॉर लोकल’लाही बळ मिळाले आणि लोकलला ग्लोबल होण्याचा मार्गही तयार झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. श्रीनगरमध्ये झालेल्या जी-20 बैठकीनंतर काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता आपण सर्व देशवासियांना मिळून जी-20 परिषद यशस्वी करून देशाची प्रतिष्ठा वाढवू, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.