गिल, सामनावीर श्रेयस अय्यर यांची शतके, सूर्यकुमारची स्फोटक खेळी, अश्विन-जडेजाचे 3-3 बळी
वृत्तसंस्था/ इंदोर
शुभमन गिल आणि सामनावीर श्रेयस अय्यर यांची शतकांसह द्विशतकी भागीदारी, सूर्यकुमार यादव व कर्णधार केएल राहुल यांची अर्धशतके आणि रविचंद्रन अश्विन व जडेजा यांची भेदक फिरकी यांच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे 99 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 50 षटकात 5 बाद 399 धावांचा डोंगर उभारला. गिलने 104 तर अय्यरने 105 धावा झळकवल्या. नंतर सूर्यकुमार व राहुल यांनीही फटकेबाजी करीत अर्धशतके नोंदवली. या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना
ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 9 अशी असताना पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत 317 धावांचे नवीन उद्दिष्ट मिळाले. पण वॉर्नर (39 चेंडूत 53), लाबुशेन (31 चेंडूत 27), सीन अॅबॉट (36 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह 54) यांचा अपवाद इतरांना भरीव योगदान देता आले नाही आणि अश्विन व जडेजाच्या फिरक़ीसमोर त्यांचा डाव 28.2 षटकांत 217 धावांत आटोपला. अश्विनने 41 धावांत तर जडेजाने 42 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय प्रसिद्ध कृष्णाने 2, शमीने 1 बळी पिटला.
गिल-अय्यरची द्विशतकी भागीदारी
हंगामी कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये नेहमी हायस्कोरिंग सामने झाले आहेत. त्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.. वनडे क्रिकेटमध्ये भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2023 च्या क्रिकेट हंगामात गिलची फलंदाजी चांगलीच बहरली असून त्याचे हे वनडे क्रिकेटमधील या वर्षातील पाचवे शतक आहे. वर्षभराच्या कालावधीतील क्रिकेट हंगामात पाच शतके झळकवणारा शुभमन गिल हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम तेंडुलकर, रोहित शर्मा, कोहली, द्रविड, गांगुली, शिखर धवन यांनी केला होता. गिलची फलंदाजी चांगलीच बहरत असल्याने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला त्याच्या फॉर्मचा निश्चितच फायदा होईल.
ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने संघाच्या डावाला सुरुवात केली पण चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हॅजलवुडने गायकवाडला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 2 चौकारासह 8 धावा जमवल्या. गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 164 चेंडूत द्विशतकी भागीदारी नोंदवली. पहिल्या पॉवर प्लेच्या 10 षटकात भारताने 80 धावा जमवताना एकमेव फलंदाज गमवला.
भारताचे पहिले अर्धशतक 49 चेंडूत फलकावर लागले. गिल आणि अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी 29 चेंडूत नोंदवली दरम्यान 9.5 षटकात भारताने 1 बाद 79 धावा जमवल्या असताना किरकोळ पावसाच्या सरी आल्याने काहीवेळ खेळ थांबवावा लागला होता. पावसामुळे सुमारे 40 मिनिटांचा खेळ वाया गेला. भारताचे शतक 77 चेंडूत फलकावर लागले. शुभमन गिलने 37 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण करताना अय्यर समवेत दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी 65 चेंडूत पूर्ण केली. गिलचे अर्धशतक झाल्यानंतर अय्यरने आपले अर्धशतक 41 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने झळकवले. भारताच्या 150 धावा 118 चेंडूत तर गिल आणि अय्यर यांनी दुसऱ्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी 107 चेंडूत पूर्ण केली. भारताचे द्विशतक 172 चेंडूत नोंदवले गेले.
जॉन्सन, हॅझलवूड, अॅबॉट, ग्रीन, झम्पा आणि शॉर्ट या गोलंदाजांना गिल आणि अय्यर यांना फटकेबाजीपासून रोखता आले नाही. श्रेयस अय्यरने 86 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह शतक झळकवले. त्यानंतर गिलने 92 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह आपले शतक झळकवले. डावातील 31 व्या षटकात भारताची ही जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. अॅबॉटने अय्यरला शॉर्टकरवी झेलबाद केले. त्याने 90 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 105 धावा झळकवल्या. अय्यर बाद झाल्यानंतर गिल फारवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. ग्रीनने त्याला कॅरेकरवी झेलबाद केले. गिलने 97 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 104 धावा जमवल्या. भारताच्या 250 धावा 212 चेंडूत नोंदवल्या गेल्या. कर्णधार राहुल आणि इशान किसन यांनी चौथ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. झम्पाने किसनला कॅरेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 31 धावा जमवल्या. भारताचे त्रिशतक 242 चेंडूत नोंदवले गेले. कर्णधार राहुलने 35 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाने शेवटच्या पॉवर प्ले दरम्यानच्या 10 षटकात 103 धावा झोडपल्या. भारताच्या 350 धावा 274 चेंडूत नोंदवल्या गेल्या. ग्रीनने राहुलचा त्रिफळा उडवला. त्याने 38 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 52 धावा जमवल्या. राहुलने सूर्यकुमार समवेत पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केवळ 32 चेंडूत नोंदवली.
सूर्यकुमार यादवने आपल्या नेहमीच्या शैलीने आक्रमक आणि उत्तुंग फटके मारण्यावर अधिक भर दिला. सूर्यकुमारने केवळ 34 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 72 धावा झोडपल्या. रविंद्र जडेजाने 9 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 13 धावा केल्या. गिलचे या मालिकेतील हे सलग दुसरे शतक आहे. गिल आणि अय्यर यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपली शतके पूर्ण केली. सूर्यकुमारने डावातील 44 व्या षटकात ग्रीनच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार खेचले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना षटकांची गती राखता न आल्याने त्यांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियातर्फे ग्रिनने 2 तर हॅझलवूड, अॅबॉट आणि झम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताच्या डावात 18 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले.
गिलचे पाचवे शतक
सलामीचा फलंदाज शुभमन गिलची फलंदाजी 2023 च्या क्रिकेट हंगामात चांगलीच बहरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने आपले सलग दुसरे शतक झळकवले. 24 वर्षीय गिलचे चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामातील हे पाचवे शतक आहे. वर्षभराच्या क्रिकेट हंगामात पाच शतके झळकवणाऱ्या भारताच्या फलंदाजांच्या यादीमध्ये यापूर्वी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. आता या यादीमध्ये गिलचा समावेश झाला आहे. असा पराक्रम करणारा तो सातवा भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीने वर्षभराच्या क्रिकेट हंगामात पाच किंवा त्यापेक्षा अधिक शतके नोंदवण्याचा पराक्रम चारवेळा केला आहे. विराटने 2012 साली पाच शतके, 2017 साली सहा शतके, 2018 साली पाच शतके तर 2019 साली 7 शतके नोंदवली. सचिन तेंडुलकरने 1996 साली 6 शतके, 1998 साली 9 शतके झळकवली. 1999 साली राहुल द्रविडने 6 शतके झळकवली होती. 2000 साली माजी कर्णधार सौरभ गांगुलीने 7 शतके तर 2013 साली शिखर धवनने 5 शतके झळकवली होती. शुभमन गिल याच्या फलंदाजीचा फॉर्म चांगलाच बहरला असून त्याने चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात आतापर्यंत 20 वनडे सामन्यात 72.35 धावांच्या सरासरीने तसेच 105.03 स्ट्राईक रेटने 1230 धावा जमवल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात गिलची 208 धावांची सर्वोच्च खेळी झाली होती. क्रिकेटच्या विविध प्रकारात गिलने चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात 36 सामने आणि 39 डावात 1764 धावा जमवल्या आहेत. त्याने 7 शतके आणि 6 अर्धशतके झळकवली आहेत.
पावसाचा अडथळा
भारताकडून मिळालेल्या 400 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाने 9 षटकात 2 बाद 56 धावा जमवल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ थांबवला होता. दरम्यान भारतीय संघातील वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आपल्या भेदक आणि अचूक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज बाद केले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्याच षटकात शॉर्ट आणि कर्णधार स्मिथ यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. प्रसिद्धच्या गोलंदाजीवर अश्विनने शॉर्टला टिपले. त्याने 8 चेंडूत 2 चौकारांसह 9 धावा जमवल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार स्मिथ प्रसिद्धच्या पुढील चेंडूवर गिलकरवी झेलबाद झाला. स्मिथला खातेही उघडता आले नाही. मात्र, अनुभवी वॉर्नर व लाबुशेन या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी वॉर्नर 5 चौकारांसह 26, तर लाबुशेन 3 चौकारांसह 17 धावावर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 5 बाद 399 (गायकवाड 2 चौकारांसह 8, गिल 97 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 104, अय्यर 90 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 105, के. एल. राहुल 38 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 52, इशान किसन 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 31, सूर्यकुमार यादव 37 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 72, जडेजा 9 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 13, अवांतर 14, हॅझलवूड 1-62, अॅबॉट 1-91, झम्पा 1-67, ग्रीन 2-103).