वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारताने पहिल्या सत्रामध्ये दोन झटपट गोल करून वर्चस्व मिळवत मंगोलियाचा 2-0 असा पराभव केला आणि इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेतील मोहिमेची विजयाने सुऊवात केली. कलिंगा स्टेडियमवर उष्ण आणि दमट वातावरणात सहाल अब्दुल समद आणि लल्लियांझुआला छांगटे यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि 14 व्या मिनिटाला गोल केल्याने जगात 101 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीयांनी 183 व्या स्थानावर असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
2018 मध्ये विजेतपद मिळविलेल्या भारताने सामन्यावर बहुतेक वेळ वर्चस्व राखताना भरपूर आक्रमण केले आणि संधी निर्माण केल्या, तर मंगोलियन खेळाडू बचाव करण्यातच व्यस्त राहिले. सामन्यात चेंडूचा ताबा 65 टक्के यजमानांकडे राहिला. असे असले, तरी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमेक यांच्यासाठी चिंतेचा भाग म्हणजे उत्तरार्धात अनेक वेळा आक्रमणे करूनही गोल करण्यात भारतीय खेळाडूंना यश आले नाही. कर्णधार छेत्रीसाठी हा सामना फारसा उल्लेखनीय ठरला नाही आणि 71 व्या मिनिटाला रहिम अलीने त्याची जागा घेतली. लालेंगमाविया राल्टेला देखील अपेक्षेनुरुप कामगिरी करता आली नाही आणि त्याची जागा जिक्सन सिंगने घेतली.
भारताने वेगवान सुऊवात केली आणि 15 मिनिटांत सहाल व छांगटे यांच्या कामगिरीच्या जोरावर 2-0 अशी आघाडी घेतली. मध्यफळीतील खेळाडू अनिऊद्ध थापा दुसऱ्या मिनिटाला मंगोलियाच्या गोलपोस्टच्या उजव्या बाजूस पोहोचला असता त्याने हाणलेल्या चेंडूला मंगोलियन गोलरक्षकाचा हात लागला असला, तरी साहलने डाव्या पायाने चेंडू जाळ्यात टाकण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर काही काळ मंगोलियन खेळाडूंनी चेंडू स्वत:कडे ठेवत स्थिरावण्याचा प्रयत्न केला. पण भारतीयांनी पुन्हा वर्चस्व मिळवत लवकरच दुसरा गोल केला.
14 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवरील संदेश झिंगनचा हेडर मंगोलियन बचावपटूला आदळून परतल्यावर छांगटेने मिळालेल्या संधीचा फायदा घेत चेंडू जाळ्यात सारला. तीन मिनिटांनंतर उदंता सिंगला कर्णधार छेत्रीकडून मंगोलियन गोलक्षेत्रात चेंडू मिळाला असता त्याला एका बचावपटूने पाडल्याचे दिसले. भारतीयांनी यावेळी पेनल्टीची मागणी केली, पण पंचांनी ती मानून घेतली नाही. मंगोलियानेही 37 व्या मिनिटाला पेनल्टीचा दावा केला. यावेळी त्यांचा मिडफिल्डर बालजिन्न्यम बॅटमुंखला अन्वर अलीने मागून पाडले होते. परंतु पंचांनी पाहुण्या संघाचा दावा फेटाळून लावला.
पहिल्या सत्रात भारताकडे चेंडूचा 53 टक्के ताबा राहिला आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलच्या रोखाने सात फटके हाणले, त्यापैकी तीन लक्ष्यावर राहिले. उत्तरार्धात भारतीय संघाचे वर्चस्व कायम राहिल। परंतु मंगोलियन बचाव मोडून काढणे त्यांना कठीण गेले. मंगोलियन बचावफळीने पहिल्यापेक्षा दुसऱ्या 45 मिनिटांत चांगली कामगिरी केली. कारण त्यांनी भारतीयांना गोल करण्यापासून रोखण्यासाठी अधिक खेळाडू बचावफळीत आणले. हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहण्यासाठी एक मिनिटाची शांतता पाळली. सोमवारी भारताचा दुसरा साखळी सामना वानुआतूशी होणार आहे.