व्हॉलिबॉलमध्ये भारताचा बलाढ्या द.कोरिया धक्का : शनिवारी होणार मुख्य स्पर्धेचे उद्घाटन
फुटबॉलमध्ये चीनकडून भारताचा पराभव : महिला क्रिकेटमध्ये भारताची लढत मलेशियाशी
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई स्पर्धेला चीनच्या हांगझू येथे सुरुवात झाली आहे. खरं तर या स्पर्धेचे आयोजन गेल्या वर्षी होणार होते मात्र कोरोना संकटामुळे आयोजन रद्द करण्यात आले होते. यामुळे यंदा चीनमधील हांगझाऊ येथे 19 व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि बीच व्हॉलिबॉल स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढच्या 15 दिवसात 41 स्पर्धा पार पडणार आहेत. भारताकडून 655 खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यात 328 महिला आणि 325 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, व्हॉलिबॉलमध्ये पुरुष गटात भारताने सलग दुसरा विजय मिळवताना बलाढ्या दक्षिण कोरियाचा 32 असा पराभव केला.तसेच रोईंगमध्ये देखील पुरुष व महिला संघाने विजयी सुरुवात केली. दुसरीकडे फुटबॉलमध्ये भारतीय संघाला चीनने 5-1 ने मात दिली.
पुरुष व्हॉलिबॉल संघाची विजयी सलामी
दुसरीकडे पुरुष व्हॉलिबॉल संघाने धमाकेदार सुरुवात करताना तुलनेने कमकुवत असलेल्या मंगळवारी कंबोडियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. भारतीय संघाने कंबोडियाला 25-14, 25-13, 25-19 असे नमवले. विशेष म्हणजे, या लढतीत पुरुष संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी कंबोडियन संघाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. यानंतर बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताने कोरियाचा 25-27, 29-27, 25-22, 20-25, 17-25 असा पराभव केला. या विजयासह भारताने क गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता, उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत चिनी तैपेई व मंगोलिया यांच्यातील विजेत्यांशी होईल. भारत क गटात असून या गटात कंबोडिया व दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे. दरम्यान, व्हॉलिबॉल प्रकारात 19 संघांनी सहभाग नोंदवला आहे.
फुटबॉलमध्ये चीनकडून पराभव
भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात यजमान चीनकडून 1-5 अशा निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. चीनसाठी ताओ कियांगलोंग (72 व्या मिनिटाला व 75 व्या मि.) यांनी दोन गोल झळकावले. तर, गियाओ तियानयी (17 व्या मि.), डेई वेइजुन (51 व्या मि.) व हाओ फेंग यांनी प्रत्येक एक गोल झळकावत साथ दिली. तयारीशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून एकमेव गोल राहुल केपीने पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत केला. भारतीय संघाने जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या चीनला आव्हान दिले. भारतीय गुरमीत सिंग चहलने यादरम्यान चमकदार कामगिरी करताना चीनचा कर्णधार झू चेनजीच्या पेनल्टी किकला रोखले. पुढच्या फेरीत आगेकूच करण्यासाठी भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताचा पुढील सामना आज बांगलादेशशी होणार आहे.
दमट वातावरण व सरावाच्या अभावामुळे सुरुवातीच्या अर्ध्या तासातच भारतीय संघ थकलेला जाणवला व त्यांच्याकडे चिनी खेळाडूंच्या आक्रमणाचे उत्तर नव्हते. संदेश झिंगनच्या चुकीमुळे दुसरा गोल होऊनही चीनने नंतर तीन आणखी गोल केले. कर्णधार सुनील छेत्री 85 मिनिटांपर्यंत मैदानात राहिला. मात्र, त्याला सहक्रायांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. भारतासाठी राहुल केपीने चांगली कामगिरी केली. 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या राहुलने संघासाठी निर्णायक गोल केला.
महिला क्रिकेटमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारत-मलेशिया आमनेसामने
यंदाची आशियाई क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान, महिला क्रिकेटमधील भारतीय महिला संघाचा सामना दुबळ्या मलेशियाविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या लढतीत विजयाच्या निर्धाराने उतरेल यात शंकाच नाही. दरम्यान, हा सामना भारतीय महिलांनी जिंकल्यास 24 सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. यानंतर 25 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्रकार, तीतास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनुषा बारे•ाr.
मंगोलियाचा अवघ्या 15 धावांत खुर्दा
क्रिकेटमध्ये कधी कोणता सामना पलटेल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत आला. मंगळवारी इंडोनेशिया आणि मंगोलिया महिला संघात सामना पार पडला. इंडोनेशियाने मंगोलियाला 172 धावांनी पराभूत केले. यात मंगोलिया संघाला 20 षटकात फक्त 15 धावा करता आल्या. या सामन्यात इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 187 धावा केल्या. मंगोलियाला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले. विजयासाठी दिलेले आव्हान गाठताना मंगोलियाचा संपूर्ण डाव पत्त्यासारखा कोसळला. त्यांचा संपूर्ण संघ 15 धावांवर बाद झाला. यात 5 धावा नोबॉल, वाईड, बाइज अशा एक्स्ट्रा आहेत. मंगोलिया संघातील फलंदाजाचा सर्वात मोठा स्कोअर हा 3 धावा इतकाच आहे. विशेष म्हणजे, इंडोनेशियाने महिला क्रिकेट संघाचा टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी त्यांनी फिलीपिन्सला 21 डिसेंबर 2019 ला 182 धावांनी आणि 22 डिसेंबर 2019 ला 187 धावांनी पराभूत केलं होते.
सुवर्ण मिळवण्यासाठी प्रयत्नशील – लक्ष्य सेन
भारतीय संघ भक्कम असून, थॉमस चषक विजेतेपदामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही निश्चितपणे विजेतेपद मिळवू असा विश्वास युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने व्यक्त केला. 28 सप्टेंबरपासून बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
लक्ष्य सेन या स्पर्धेत केवळ सांघिक गटात खेळणार आहे. आशियाई स्पर्धेचे वातावरण हे राष्ट्रकुल आणि युवा ऑलिम्पिकसारखेच आहे. त्यामुळे आम्ही या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचबरोबर अन्य देशातील खेळाडूंची आणि त्यांच्या खेळाची आम्हाला माहिती होईल. हा अनुभव वेगळाच असतो, असे सेन यावेळी म्हणाला. यावेळी केवळ सांघिक विभागात खेळणार असल्याने माझ्याकडे सराव करण्यासाठी भरपूर वेळ आहे, असेही तो यावेळी म्हणाला.
40 खेळ, 481 स्पर्धा, शनिवारी थाटात होणार ओपनिंग
आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन चीनमधील हांगझोऊ शहरात होत आहे. ही स्पर्धा अधिकृतपणे 23 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 8 ऑक्टोबर रोजी संपेल. मात्र, फुटबॉल, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटसह काही स्पर्धा अधिकृत प्रारंभ तारखेपूर्वी सुरू होतील. दरम्यान, आशियाई स्पर्धेत 40 खेळांमधील 481 स्पर्धा असतील ज्यात 45 देशांतील खेळाडूंचा समावेश असेल. यामध्ये भारतीय खेळाडू 39 खेळांमध्ये पदकांसाठी स्पर्धा करतील.
भारताच्या 655 सदस्यीय चमूमध्ये अॅथलेटिक्सचे 68 सदस्य आहेत. यामध्ये 35 पुरुष आणि 33 महिला आहेत. भारतीय क्रिकेट संघ प्रथमच या स्पर्धेचा भाग बनला आहेत. पुरुष संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड आणि महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाइन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया, सर्व ऑलिम्पिक पदक विजेते देखील हांगझोऊमध्ये पदके मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हरमनप्रीत सिंग अन् लवलिनाला मिळणार ‘ध्वजधारक‘ होण्याचा मान
चीनमधील होंगझाऊ येथे 23 सप्टेंबरपासून एशियन गेम्सला सुरूवात होणार आहे. या दिवशी एशियन गेम्सचा उद्घाटन सोहळा होणार असून यासाठी भारतीय खेळाडूंच्या समुहाचे नेतृत्व हे भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन करणार आहेत. या दोघांना एशियन गेम्समध्ये भारताचे ध्वजधारक होण्याचा मान मिळणार आहे. बुधवारी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेतृत्व हे हरमनप्रीत सिंग आणि लवलिना बोरगोहेन संयुक्तरित्या करतील, असा निर्णय घेतला.