कोलकाता
भारत आणि अमेरिकेचे हवाई दल 10 एप्रिलपासून पश्चिम बंगालमधील कलाई कुंडा विमानतळावर युद्धाभ्यास करणार आहेत. या सरावात अमेरिकन हवाई दलाच्या एफ-15 स्ट्राईक ईगल लढाऊ विमानाचा एक स्क्वॉड्रनही सहभागी होणार आहे. दुसरीकडे भारत या सरावात आपली रशियन बनावटीची सुखोई-30 विमाने तैनात करणार आहे. कोप इंडिया अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान हा सराव होणार आहे.
भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली हवाई दल मानले जाते. भारतीय हवाई दलाकडे असलेली काही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली सध्या जगात फक्त अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांकडे आहेत. युद्धासाठी आवश्यक विमानांबरोबरच भारतीय हवाई दलाकडे इतर अनेक मालवाहू विमाने आणि अटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. तसेच चेतक आणि चीता हेलिकॉप्टरचा ताफा शोध आणि बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.