मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : 24 तास सेवेत, प्रवाशांची गैरसोय दूर
प्रतिनिधी / बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात जनसंपर्क आणि माहिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य वनसंरक्षण अधिकारी मंजुनाथ चव्हाण, केएएस अधिकारी राजश्री जैनापुरे, विभागीय नियंत्रक गणेश राठोड आदींच्या हस्ते या कार्यालयाला चालना देण्यात आली.
मध्यवर्ती बसस्थानक दररोज हजारो प्रवाशांनी गजबजलेले असते. मात्र बऱ्याच प्रवाशांना बससंबंधी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे गैरसोय होते. प्रवासी बससाठी भटकंती करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना बसविषयी माहिती देण्यासाठी जनसंपर्क आणि माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. काँग्रेसने 5 गॅरंटी योजनांचा आदेश दिला आहे. त्यामध्ये 11 जूनपासून महिलांना मोफत बसप्रवास दिला जाणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी माहिती कक्ष उघडण्यात आला आहे. याठिकाणी 24 तास प्रवाशांना बससंबंधी माहिती दिली जाणार आहे. कोणती बस किती वाजता सुटणार आहे, कोणती बस कोणत्या फलाटवर थांबणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. याबरोबरच बसचे वेळापत्रक, आगावू तिकीट बुकिंग, बसपाससंबंधी माहिती, अपंग, रुग्ण आणि वयोवृद्धांनादेखील आवश्यक माहिती दिली जाणार आहे. स्मार्ट बसस्थानक उभारून विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र बसस्थानकात माहिती कक्ष नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता बसस्थानकात माहिती कक्ष उपलब्ध झाल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 24 तास हा माहिती कक्ष प्रवाशांच्या सेवेत सुरू राहणार आहे.