वृत्तसंस्था/ दोहा
ब्राझीलचा स्ट्रायकर नेमारची विश्वचषक स्पर्धेतील दुसरी लढत हुकणार आहे. सर्बियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यावेळी त्याच्या घोटय़ाच्या स्नायूंना दुखापत झाली असल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही, असे संघाच्या डॉक्टरांनी सांगितले. 28 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचा दुसरा सामना स्वित्झर्लंडविरुद्ध होणार आहे.
नेमारच्या उजव्या पायाच्या घोटय़ाची तपासणी करण्यात आली असून त्यात त्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारी होणाऱया ब्राझीलच्या दुसऱया लढतीसाठी तो पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही. त्याच्या प्रगतीची रोज तपासणी केली जाणार असून त्याबद्दल माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुखापत झाल्यानंतर तो सामन्यात दहा मिनिटे खेळला. पण नंतर वेदना जास्त झाल्याने त्याच्या जागी अँटनीला खेळविण्यात आले.