ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्वदेशी बनावटीची शक्तीशाली युद्धनौका INS मुरमुगाव आज भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. या युद्धनौकेमुळे सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार म्हणाले, गेल्या दशकात युद्धनौका डिझाइन आणि बांधणी क्षमतेत आम्ही घेतलेल्या प्रचंड कष्टाचे आज चीज होत आहे. मुरगाव डिस्ट्रॉयर मिसाईल आज नौदलाला सुपूर्द करण्यात आली आहे. स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या इतिहासातील आजचा दिवस एक मैलाचा दगड आहे. शहरांच्या नावाने जहाजांची नावे ठेवण्याची नौदलाची परंपरा आहे, ज्यामुळे जहाज आणि शहरांमध्ये नाळ निर्माण होते.
ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे. या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने या युद्धनौकेचे डिझाईन केले आहे. भारतात बांधलेल्या सर्वात प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते.