कागदपत्रांची पडताळणी करून केल्या सूचना
बेळगाव : शहरातील दक्षिण उपनोंदणी कार्यालयाबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. एका वकिलाने त्या कार्यालयाविरोधात तक्रार दिल्यामुळे लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी दुपारी तपासणी सुरू केल्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. लोकायुक्त एसपी हनुमंत रायप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली ही तपासणी केली. यावेळी कागदपत्रांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन कामांबाबत माहिती घेतली. नोंदणी मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी या सर्व विभागांची तपासणी केली. तुमच्याबद्दल लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बेकायदेशीर कामे थांबविण्याची सूचना करण्यात आली.
उपनोंदणी अधिकाऱ्यांच्या संगणकामधील डेटा तपासण्यात आला आणि यावेळी कांही त्रुटी आढळल्या. यामध्ये कांही फेरफार दिसून आला. त्यामुळे याची चौकशी केली. यावेळी उपनोंदणी अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिली. कांही शंकाबाबत त्यांनी लोकायुक्त अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे लोकायुक्त पोलिसांचा संभ्रम दूर झाला. मात्र तक्रारी वाढल्या असून काम सुरळीत करावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली. ऑफीसमधील एजंटांचा वावर तातडीने थांबवावा असे लोकायुक्त एसपी हनुमंत रायप्पा यांनी सांगितले. यावेळी लोकायुक्त पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, आवटी यांच्यासह इतर लोकायुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकायुक्तांनी तपासणी सुरू केल्यामुळे खळबळ उडाली होती.