हिंडलगा येथील कार्यालयाला भेट : टप्प्याटप्प्याने सर्व यंत्रांची होणार तपासणी
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल) ही नवीन यंत्रे बेळगावात पाठविण्यात आली असून ती हिंडलगा येथील गोदामामध्ये ठेवण्यात आली आहेत. त्या यंत्रांची तपासणी निवडणूक कर्मचारी करत आहेत. त्याठिकाणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन या सर्व व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनसंदर्भातील माहिती घेतली आहे.
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी 7 हजार 216 ईव्हीएम आणि 6 हजार 319 व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान यंत्रणेची पडताळणी पूर्ण काळजीपूर्वक करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. पारदर्शकपणा ठेवूनच ही निवडणूक झाली पाहिजे, याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करावे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी सांगितले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी करण्यासाठी 30 कुशल अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व यंत्रांची पूर्णपणे तपासणी केली जाईल. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत त्याचे प्रात्यक्षिक घेऊन पाहणी केली जाणार आहे. या यंत्रांची तपासणी राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समक्षच केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मतदान केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, याचबरोबर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सॉफ्टवेअर स्कॅन करणे, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन युएटीसीशी कनेक्ट करण्यात येणार आहे. पडताळणीवेळी कोणत्याही यंत्रामध्ये बिघाड आढळल्यास ते यंत्र परत पाठविले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत नूतन अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, निवडणूक अधिकारी गीता कौलगी, सतीशकुमार, बेळगावचे प्रांताधिकारी बाळाराम चव्हाण, चिकोडीचे प्रांताधिकारी माधव गीते यांच्यासह इतर अधिकारी तसेच विविध पक्षांचे राजकीय प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.