मुस्लिम कुटुंबाकडून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; चिमुकल्या जहिरचे सर्व स्तरातून कौतुक
अमोल फुलारी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील एक मुस्लीम धर्मीय मुलगा गेल्या ११ वर्षापासुन घरात गणपतीची प्रतिष्ठापणा करत असुन विविधत पुजा- अर्चा करून मिरवणुक काढुन विसर्जन करतो. यातून त्याने हिंदु मुस्लिम सामजिक एकतेचा आदर्श सर्वासमोर ठेवला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जहिर हुसेन बिराजदार (रा. खैराट)असे या मुलाचे नांव असुन तो इयत्ता १०वीत आहे.
बालवाडीत असल्यापासुन वयाच्या चौथ्या वर्षापासुन जहिरला बाप्पाचे आकर्षण होते. सलग १२ वर्षे झाले तो विधिवत गणेश मुर्तीची स्थापना करून सकाळ संध्याकाळ आरती करतो. या गणेश पुजनच्या वेळी त्याचे शेजारचे मित्रमंडळीही हजेरी लावतात. या लहान मुलाचे आदर्श घेऊन आपण एकमेकांचे सण उत्सव साजरे करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे व जगात सर्वश्रेष्ठ आहे अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल हुसेन बिराजदार यांनी व्यक्त केली. जाहिरच्या कुंटुंबाचेही त्याच्या या उपक्रमात सहकार्य असते. जहिरचे दोन मोठे भाऊ आणि चुलत बहिण- भाऊही या उत्सवात सहभागी होतात. जहिर नित्यनियमाने नमाज पठणासाठी मशिदीतही जातो.खैराट गावातील या कुंटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“मला गणपती बसवण्यात खूप आनंद भेटतो. दररोज सकाळी नैवेद्य पूजा -अर्चा मनोभावे पूजन करतो. विसर्जन वेळी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून समारोप करत असतो. मी यापुढेही असेच निरंतर गणपती बाप्पा घरी बसवणार आणि भक्तिभावाने पुजणार.” असे जहीरने तरूंण भारतशी बोलताना म्हटले.