शस्त्रक्रियेसाठीचे दोन लाख रुपये गायब : सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास
वास्को : दाबोळीतील एका घरात 6 लाख 90 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच 2 लाखांची रोकड मिळून 8 लाख 90 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी याच घरातील मोलकरीण व अन्य एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस या दोघांची कसून चौकशी करीत आहेत. या चोरी प्रकरणी घरमालक हेमिल्टन फुर्तादो यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरा मोलकरीण व अन्य महिलेला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीचा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. दाबोळीतील या घरात हेमिल्टन डिसोजा व त्यांची पत्नी हे वृध्द जोडपे आपल्या लहान नातीसह राहतात. त्यांच्याकडे एक मोलकरणीही आहे.
शस्त्रक्रियेसाठीची रोकड गायब
वृध्द हेमिल्टन यांनी आपल्यावरील शस्त्रक्रियेसाठी दोन लाखांची रोकड घरात आणून ठेवली होती. ही रक्कम कपाटातून गायब झाल्याचे त्यांच्या नजरेस आल्याने त्यांनी त्वरित आपल्या पत्नीकडे चौकशी केली. मात्र, तिलाही या रोख रक्कमेबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांनी घरात शोधाशोध केली. तरीही रक्कम काही मिळाली नाही.
सात लाखांचे दागिने लंपास
पत्नी संशयानेच घरातील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी करण्यासाठी वळली असता तिलाही जबरदस्त धक्का बसला. घरातील 6 लाख 90 हजार रूपये किमतीचे दागिनेही चोरट्याने गायब केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर घरमालकाने वास्को पोलिसांशी संपर्क साधून आपल्या घरातील एकूण 8 लाख 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची तक्रार केली.
मोलकरणीसह दोघांना अटक, पण गूढ कायम
घरमालक हेमिल्टन फुर्तादो यांनी आपल्यावरील वैद्यकीय शस्त्रक्रीयेसाठी दोन लाखांची रक्कम घरात ठेवली होती. ही रक्कम व सोन्याचे दागिने मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज घरात काम करणाऱ्या मोलकरणीने चोरला असावा, असा संशय वृध्द दांपत्याने व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्या मोलकरणीसह अन्य एका महिलेलाही अटक करुन चौकशी सुरू केली आहे. निश्चित चोरटा कोण, हे रात्री उशिरापर्यंत उघडकीस आले नव्हते.