वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात अपमानास्पद टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. ज्यामुळे भारतीय जनता पक्षाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कठोर कारवाई केल्याखेरीज या मंत्र्याचा माज उतरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. आपल्या विधानामुळे निर्माण झालेले वादळ पाहून या मंत्र्याने खेद व्यक्त केला आहे. मात्र, क्षमायाचना केलेली नाही.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दिसण्याबद्दल या मंत्र्याने काही खोडसाळ आणि अवमानजनक शब्द वापरले आहेत. तृणमूल काँग्रेसनेही या प्रकरणी हात झटकले असून मंत्र्याच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, मंत्र्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात कानावर हात ठेवले आहेत. द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या असल्याने त्या राज्यात विशेष करून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.