महाग कर्जांपासून लवकर सुटका नाही ः आरबीआय गव्हर्नरांचे वक्तव्य
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाग कर्जांप्रकरणी लवकर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. अद्याप काही काळापर्यंत गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जावर अधिक व्याजदर राहू शकतात. रिझर्व्ह बँकेने अशाप्रकारचे संकेत दिले आहेत. युक्रेन युद्ध सुरूच राहिल्यास व्याजदर दीर्घकाळापर्यंत अधिक राहू शकतात असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
पुरवठा साखळीशी निगडित मुद्दय़ांवर सुधारणा होत महागाईत घट होऊ शकते. फेब्रुवारीत होणाऱया पतधोरण समिती बैठकीच्या निर्णंयांसंबंधी मी कुठलेच संकेत देत नाही. भू-राजनयिक तणाव कायम राहिल्यास व्याजदर दीर्घकाळापर्यंत अधिक राहणार आहे. केवळ अमेरिका नव्हे तर जगभरात असे घडू शकते असे दास यांनी म्हटले आहे.
महागाईत घट शक्य
सातत्याने भू-राजनयिक तणावानंतरही नव्या स्थितीत कशाप्रकारे स्वतःला सामावून घ्यावे हे मानवी समाज ओळखून आहे. जागतिक पुरवठा साखळीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. तसेच नवे मार्ग तयार होत अताहेत. जगातील देश नव्या पुरवठा स्रोतांकडे पाहत आहेत. यामुळे महागाईत घट होऊ शकते असे उद्गार आरबीआय गव्हर्नर दास यांनी काढले आहेत.
अर्थ मरगळ कमी गंभीर राहणार
आर्थिक मरगळ पूर्वीच्या अपेक्षेच्या तुलनेत कमी गंभीर राहू शकते. 6 महिन्यांपूर्वी युरोपीय महासंघ आणि अमेरिकेत मंदी येणार असल्याचे सर्वांचे मानणे होते. परंतु आता गोष्टी सुधारल्या आहेत. परंतु व्याजदर दीर्घकाळापर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. अनिश्चितता पाहता सर्व परिस्थितींसाठी तयार रहावे लागणार असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
व्याजदर वाढविणे होते आवश्यक
मागील व्याजदर वृद्धीमुळे महागाईत घट होण्यास 7-8 महिने लागणार आहेत. एक सोप्या स्थितीत रोकड प्रवाह वेगाने होतो, परंतु आव्हानात्मक स्थितीत यात अधिक वेळ लागतो. व्याजदर वृद्धीचा प्रभाव जाणवण्यास 4 तिमाहींचा कालावधी लागणार असल्याचे आरबीआयच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. किमती वाढल्यावर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयला व्याजदर वाढवावे लागतात. अन्यथा अर्थव्यवस्थेतील घटक उत्पादनखर्च अधिक वाढवत उत्पादनांचे मूल्य निर्धारित करण्यास सुरुवात करतात असे आरबीआय गव्हर्नरांनी सांगितले आहे.