तंत्रज्ञानविषयक संकल्पनांची देवाणघेवाण यावर विचारविनिमय होणार
बेळगाव : ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स’ (आयईईई) च्या कर्नाटक विभागातर्फे एनके-कॉन-2023 ही आंतरराष्ट्रीय परिषद दि. 19 व 20 नोव्हेंबर रोजी केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्यावतीने भरविण्यात येत आहे. ‘द आर्ट ऑफ इंजिनिअरिंग मास्टरिंग इनोव्हेशन अँड इमॅजिनेशन’ हे या परिषदेचे सूत्र असल्याचे परिषदेच्या चेअरपर्सन डॉ. कृपा रासने यांनी सांगितले. शेषगिरी कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, या निमित्ताने अभियांत्रिकी प्राध्यापक, संशोधक, विचारवंत, कारखानदार आणि विद्यार्थी यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र यावे व तंत्रज्ञानविषयक संकल्पनांची देवाणघेवाण करावी. नवतंत्रज्ञान समजून घ्यावे तसेच तंत्रज्ञान, विज्ञान यांचा समाजासाठी कसा उपयोग होईल, यावर विचारविनिमय करावा, या हेतूने ही परिषद भरविण्यात आली आहे. परिषदेत तंत्रज्ञानविषयक तसेच संवाद कौशल्यविषयक नऊ घटकांची विभागणी करण्यात आली आहे. परिषदेमध्ये पेपर सादर करण्याची संधी मिळणार असून त्यासाठीचे पेपर किंवा निबंध मागवण्यात आले आहेत. एकूण 200 पेपर आले असून त्यापैकी अत्यंत काटेकोर पातळीवर 114 पेपर निवडण्यात आले आहेत. सदर पेपर पीएचडी पदवीधारक तीन परीक्षकांनी पडताळले पाहिजेत, असा नियम करण्यात आल्याने गुणवत्तेलाच प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.
परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते येणार असून चंदीगढ, हैद्राबाद, गोवा, जम्मू येथील प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. सिंगापूर येथील डॉ. दीपक वायकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आयईईईच्या या परिषदेसाठी बेंगळूर विभागाचे चेअरपर्सन डॉ. अलोकनाथ डे यांचे तांत्रिक साहाय्य लाभले आहे. याशिवाय कुलगुरु डॉ. अशोक शेट्टर व प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शेषगिरीचे प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, 1916 साली स्थापन झालेल्या केएलई संस्थेने डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती केली असून आज 390 शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. एआयसीटीई, के-टेक् यांच्या सहकार्याने स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येत आहे. आयईईईचे कर्नाटक विभागाचे खजिनदार प्रा. अभिषेक देशमुख यांनी 125 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये ही संस्था स्थापन झाली असून आज 5 लाख सदस्य आहेत आणि विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख तंत्रज्ञानाशी संलग्न राहावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. शेषगिरी कॉलेजच्या ईईई विभाग प्रमुख डॉ. राखी कळ्ळीमनी यांनी स्वागत केले. प्रा. तेजस जोशी यांनी आभार मानले. आयईईई कर्नाटक विभागाचे सचिव डॉ. विरुपाक्षी दलाल, एमबीए विभागाचे प्रा. वैभव बाडगी व ई अँड सी विभागाच्या प्रा. तमालिका चौधरी उपस्थित होते.