ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात दाखल असलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांचे पथक ब्रिजभूषण यांच्या लखनऊ आणि गोंडा येथील घरी झाले. ब्रिजभूषण यांच्या उपस्थित पोलिसांनी 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे नोंदवले. पहिला गुन्हा एका अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपांनुसार असून, यामध्ये पॉक्सो ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसंबधित आहे. या प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत 137 लोकांची साक्ष घेतली आहे. मात्र, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृत्वात कुस्तीपटूंचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी सोमवारी रात्री ब्रिजभूषण यांचे लखनऊ आणि गोंडा येथील निवासस्थान गाठले. ब्रिजभूषण यांच्यासोबत काम करणाऱया लोकांचे नाव-पत्ते आणि ओळखपत्र साक्षीदार म्हणून गोळा केले आहेत. या चौकशीनंतर पोलिसांचे पथक दिल्लीला परत आले.