कॅनडातील विरोधी पक्षनेते पॉलिव्हिअर यांच्याकडून भलावण, खलिस्तान्यांवर टीका
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाच्या प्रगतीत येथील हिंदू समाजाने अमूल्य योगदान दिले आहे. हा समाज शांतताप्रिय असून कष्टाळू आहे, अशी भलावण कॅनडातील विरोधी पक्षनेते पिअर पॉलिव्हिअर यांनी केली आहे. सध्या भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या संदर्भात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचे मानले जात आहे.
पॉलिव्हिअर यांनी कॅनडातील खलिस्तानवाद्यांवर आणि त्यांच्या हिंसक कारवायांवर कठोर टीका केली. सर्व हिंदूंनी कॅनडा सोडावा आणि भारतात परतावे, असे प्रक्षोभक आणि अवमानजनक विधान आणखी एक दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याने केले होते. पन्नू हा भारतात बंदीं असलेल्या ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेचा म्होरक्या आहे. पन्नूचे हे विधान कॅनडाच्या संस्कृतीच्या विरुद्ध असून ते भडकावू विधान असल्याची टीकाही पॉलिव्हिअर यांनी केली.
हिंदूंचे स्वागत करु
कॅनडात नेहमीच हिंदूंचे स्वागत केले जाईल. येथे प्रत्येक कॅनडावासीयाला निर्भयपणे वास्तव्य करता येईल. तो त्या समुदायाचा अधिकारच आहे. हिंदूंना देण्यात येणाऱ्या धमक्या अत्यंत घृणास्पद आहेत. हिंदू समाजाने आमच्या देशाशी चांगले जुळवून घेतले असून आम्ही त्यांच्यासंदर्भात समाधानी आहोत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे कॅनडातील हिंदूंना दिलासा मिळाला आहे.
तणाव अद्यापही सुरुच
निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी केली, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही संपलेला नाही. कॅनडाच्या प्रशासनाने आरोपाचा पुनरुच्चार करताना आपल्याकडे ध्वनिमुद्रित पुरावे असल्याचा दावा पुन्हा केला. मात्र, यांपैकी एकही पुरावा त्या देशाने आजवर सादर केलेला नाही. तसेच या ध्वनिमुद्रणाची सत्यता किती हे देखील पडताळले गेलेले नाही. त्यामुळे आरोपांच्या वैधतेसंबंधी उपस्थित केले जाणारे प्रश्न आजही तसेच आहेत, असा आक्षेप कॅनडातील वृत्तपत्रेही घेत आहेत. त्यामुळे ट्रूडो प्रशासनाची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
जाहीर वाच्यता नको होती
निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी जाहीर वाच्यता करणे टाळावयास हवे होते, असे मत आता त्या देशातही व्यक्त होत आहे. अशी वाच्यता केल्याने ट्रूडो यांना कोणताही राजकीय लाभ मिळणे दुरापास्त आहे. ट्रुडो यांचे सरकार ज्या पक्षाच्या पाठिंब्यावर टिकून आहे, तो न्यू डेमॉव्रेटिक पार्टी हा पक्ष आणि त्याचा नेता जगमीत सिंग हे खलिस्तानचे समर्थक असल्याने ट्रूडो आपले सरकार वाचविण्यासाठी त्यांच्या कह्यात गेले आहेत, अशी टीका कॅनडामध्येही होऊ लागल्याने ट्रूडो यांचे भारताला गोवण्याचे डावपेच त्यांच्याच अंगावर शेकण्याची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे.
दहशतवाद्यांचे नंदनवन
ट्रूडो आणि जगमीतसिंग या जोडगोळीने कॅनडाला खलिस्तानवादी दहशतवाद्यांचे नंदनवन बनविले असून भारतातील खलिस्तानवादी गुन्हेगारही कॅनडात स्थिरावले आहेत. ते तेथेही शांतताभंग करीत असल्याने ट्रूडो यांची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. ही घसरण सावरण्यासाठी ट्रूडो भारताला लक्ष्य करीत आहेत, अशी टीका होत आहे. त्यामुळे ते आणि त्यांचा लिबरल पक्ष बॅकफूटवर गेल्याचे पहावयास मिळत आहे. भारताने कॅनडाला दहशतवाद्यांची सूची दिली असून कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. आता कॅनडा सरकार यासंबंधी कोणती कारवाई करणार याकडे त्या देशातही लक्ष ठेवले जाण्याची शक्यता आहे.
पुढे काय होणार
या प्रकरणात पुढे नेमके काय घडणार यासंबंधीं चर्चा सुरु आहे. भारताला काही आठवड्यांपूर्वीच पुरावे दिले आहेत, असा दावा आता कॅनडाच्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, भारताने देण्यात आलेला नाही असे स्पष्ट केलेले असून मूलत: कॅनडाचे पंतप्रधान भारतासंबंधी पक्षपाती भूमिका घेत असल्याची टीकाही भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते बागची यांनी केली होती.
वादंग सुरुच
ड भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव अद्यापही सुरुच
ड खलिस्तानवादी दहशतवाद्यांवर कारवाई करा : आवाहन
ड कॅनडाच्या अंतर्गत राजकारणातही या प्रकरणाचे पडसाद
ड भारत आपल्या भूमिकेवर ठाम, तडजोड करण्यास नकार