जिल्हाधिकाऱयांकडे ख्रिश्चन बांधवांची निवेदनाद्वारे मागणी : विश्वासात न घेताच गैरप्रकार केल्याचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
आरटीओ सर्कलजवळील मॅथॉडिस्ट चर्चच्या जागेमध्ये मोठा गैरप्रकार होत आहे. याचबरोबर भ्रष्टाचारही झाला आहे. जागेची विक्री तसेच लीजवर देण्याचा गैरप्रकार सुरू आहे. बेननस्मिथ, बीपीएड कॉलेजची जागाही बेकायदशीररित्या लीजवर दिली गेली आहे. त्यामध्येही गैरप्रकार झाला आहे. तेव्हा तातडीने चौकशी करून या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. यावेळी मोठय़ा संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
क्लब रोडवर असलेल्या बेननस्मिथ, बीपीएड कॉलेजला शिक्षणासाठी जागा देण्यात आली. मात्र त्याचे भाडे हे अत्यंत कमी आहे. लीज संपली आहे. तरी देखील बेकायदशीररित्या त्यांनाच जागा दिल्याचा आरोप देखील केला आहे. वास्तविक मिळालेल्या भाडय़ामध्येही गैरप्रकार झाला आहे. वार्षिक 5 हजार रुपये भाडे ठरवून कोणालाही विश्वासात न घेता हा प्रकार करण्यात आला आहे. याचबरोबर आरटीओ सर्कलजवळील जाग्यामध्येही गैरप्रकार झाला आहे. बेकायदेशीररित्या ती जागा लीजवर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला चर्चचे फादर्स जबाबदार असून याची चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशी करून तातडीने कारवाई करा
मॅथॉडिस्ट चर्चमधील काही जणांनी हा गैरप्रकार केला असून त्याची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा ही जागा काहीजण गिळंकृत करणार आहेत. तेव्हा याबाबत चौकशी करून तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डी. एस. चिल्हाळ, एस. व्ही. करविनकोप्प, एस. डी. मल्लण्णावर, जी. पी. राव, इसाक मेबेन, विल्सन जोसेफ, सावित्री होसमनी, डेविड होसमनी यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.