व्यवस्थापन मंडळावर कारवाई करण्याची पत्रकार परिषदेत काँग्रेसची मागणी : पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा
खानापूर : नंदगड येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीत गेल्या काहीवर्षापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. नुकताच या संस्थेच्या खत दुकानातील गैरव्यवहार समोर आल्याने या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तो कायमस्वरुपी रद्द करून इतर संस्थेच्या माध्यमातून खतविक्री सुरू करण्यात यावी, तसेच या संस्थेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून व्यवस्थापन मंडळावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली. येथील विश्रामधामात बुधवारी सकाळी काँग्रेसच्यावतीने नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या गैरव्यवहारासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी महांतेश राऊत म्हणाले, तालुक्यातील स्वातंत्र्योत्सव काळात निर्माण केलेली पहिली सोसायटी आहे. या संस्थेचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बसप्पण्णा अरगावी यांनी या संस्थेची स्थापना केली. मात्र काही वर्षापासून या संस्थेत शेतकऱ्यांच्या हिताचा अजिबात विचार केला जात नाही. शेतकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक लूट करण्यात येते. तसेच मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. यासाठी संस्थेतील गैरव्यवहाराची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच व्यवस्थापन मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करावी.
पालकमंत्र्यांकडे चौकशीसाठी पाठपुरावा
गौसलाल पटेल म्हणाले, संस्थेचा कारभार अत्यंत गौरवशाली आहे. मीही या संस्थेत पीकेपीएसच्या माध्यमातून काम केलेले आहे. मात्र अलीकडे रेशन वाटप, गॅससह इतर व्यवहारातून ग्राहकांची लूटच करण्यात येते. यासाठी तातडीने या संस्थेवर प्रशासक नेमून शेतकऱ्यांसाठी खतविक्री सुरू करावी.जॅकी फर्नांडिस म्हणाले, संस्थेत गैरव्यवहार झाला म्हणूनच शासनाने खत दुकानाचा परवाना रद्द केला आहे. यासाठी या संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराचीच चौकशी होणे गरजेचे आहे. लक्ष्मण मादार म्हणाले, संस्थेत गेल्या काहीवर्षापासून गैरव्यवहार होत असल्याची चर्चा होत होती. मात्र याबाबत ठोस माहिती समोर येत नसल्याने कारवाईसाठी आम्हाला काही करता येत नव्हते. मात्र अलीकडे अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. यातच खतविक्री परवाना रद्द झाल्याने संस्थेत आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे स्पष्ठ झाले आहे. याची दखल माजी आमदार अंजली निब्ंााळकर यांनी घेऊन पालकमंत्र्यांकडे याबाबत चौकशी करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी म्हणाले, येत्या आठ दिवसात व्यवस्थापन मंडळावर जर कारवाई झाली नसल्यास याबाबत आम्ही सहकार मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थापक मंडळाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. लक्केबैल येथील रेशन दुकानदारालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न याच संचालक मंडळाने केला होता. गॅस विक्री तसेच रेशन दुकानातील धान्य, अन्नभाग्य योजनेतील धान्य याच्यात प्रचंड गैरव्यवहार होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमून याची सखोल चौकशी करावी, अन्यथा आंदोलन उभारु तसेच सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे याबाबत दाद मागणार आहेत. यावेळी प्रकाश मादार, चंबाण्णा होसमणी, दीपक कवठणकर यासह इतरांनीही कारवाईची मागणी केली. यावेळी संदीप देसाई, गु•gसाब टेकडी, अलोक वागळे, जोतिबा शिवणगेकर, इसाक पठाण, वैष्णवी पाटील व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.