मुख्यमंत्री-नगरविकासमंत्र्यांचे लक्ष वेधणार
मडगाव : मडगावच्या नगरसेवकांनी पालिकेच्या मालकीच्या दुकानांच्या अनधिकृत विक्रीची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही विक्री पालिकेची संमती न घेता करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून नगरसेवकांनी या समस्येकडे मुख्यमंत्री व नगरविकासमंत्र्यांचे लक्ष वेधताना त्यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. नगरसेवक महेश आमोणकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने बोलताना या खरेदीत बेईमान व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप केला. पालिकेच्या मालकीची दुकाने लक्षणीयरीत्या कमी किमतीत आणि संशयास्पदरीत्या बाहेरील लोकांना विकून टाकण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या बेकायदेशीर कृतीमुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनलेल्या दुकानांच्या या प्रश्नाने अलीकडेच पुन्हा डोके वर काढले आहे. या दुकानांच्या भाडेपट्टीचे नूतनीकरण करण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने आजची परिस्थती उदभवली आहे. याव्यतिरिक्त, शेकडो विक्रेते या दुकानांसाठी केवळ 10 ते 50 ऊपये असे तुटपुंजे भाडे देत आहेत, ज्यामुळे पालिकेचे होणारे आर्थिक नुकसान आणखी वाढले आहे. नगरसेवक आमोणकर यांनी गांधी मार्केट आणि न्यू मार्केट या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीवर फसव्या योजनांद्वारे पालिकेच्या मालकीची दुकाने संशयास्पदरीत्या स्थलांतरितांना विकल्याचा आरोप आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. पालिकेने सदर दुकानांवर पुन्हा ताबा मिळवावा आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी हा यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.