अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, बंद दाराआड झाडाझडती
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये जानेवारी 2023 मध्ये करण्यात आलेल्या नोकरभरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डमधील काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बेंगळूर येथून सीबीआय तसेच इतर केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. मागील चार दिवसांपासून या पथकाकडून कॅन्टोन्मेंटच्या सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये शिपाई पदापासून अनेक वरिष्ठ पदांपर्यंत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नोकरभरती करण्यात आली. नोकरभरती करताना उमेदवारांकडून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मलिदा लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली. कॅन्टोन्मेंटमधील काही नागरिकांनी थेट केंद्रीय यंत्रणांकडे चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
बेंगळूर येथील एक पथक मागील चार दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अधिकाऱ्यांची चौकशी करीत आहे. पदभरतीत झालेला गैरव्यवहार कशा पद्धतीने झाला, याची माहिती व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांचीही केंद्रीय पथकाकडून चौकशी केली जात आहे. शनिवारी सकाळपासून कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मिटिंग हॉलमध्ये अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. बंद दरवाजा आड सकाळपासून संध्याकाळपर्यंत चौकशीचे सत्र सुरू होते. यामुळे नोकरभरती प्रक्रियेतील मोठे घबाड बाहेर पडण्याची शक्यता आहे.
अधिकारीवर्गाचे धाबे दणाणले
कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के. आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अधिकारीवर्गाचे धाबे दणाणले आहेत. आजवर कोणालाही दाद न देणारे अधिकारी शनिवारी मात्र गुपचूपपणे चौकशीला सामोरे जात होते. चौकशीचा कानोसा घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील बरेचसे नागरिकही दाखल होत होते. परंतु, कर्मचाऱ्यांकडून त्यांना थांबू दिले जात नव्हते. नोकरभरती प्रक्रियेत नेमका किती गैरव्यवहार झाला, हे आता लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
तक्रारीमुळे गैरव्यवहाराची चौकशी
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या सुधीर तुपेकर यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. 29 पदांच्या भरतीवेळी झालेल्या गैरव्यवहाराची माहिती तुपेकर यांना मिळताच त्यांनी बेंगळूर व दिल्ली येथील केंद्रीय चौकशी यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत केंद्रीय पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून ज्या उमेदवारांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आता केली जात आहे.