खलिस्तानींच्या धमकीनंतर गुजरात पोलिसांनी घेतली केंद्रीय एजन्सींची मदत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक क्रिकेट सामन्यादरम्यान स्फोट घडवण्याची धमकी खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्यानंतर मैदानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुजरात राज्य पोलिसांसह केंद्रीय एजन्सी तपास प्रक्रियेत सतर्क झाल्या आहेत. खलिस्तानी दहशतवाद्याने ऑडिओ क्लिप व्हायरल करून स्टेडियममध्ये खलिस्तानी ध्वज फडकवण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरात पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांकडे मदत मागितली आहे. यानंतर आता केंद्राच्या विविध तपास यंत्रणा, एनआयए, रॉ आणि सेंट्रल आयबी या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करणार आहेत.
खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने विश्वचषक क्रिकेट सामन्याबाबत धमकी दिली आहे. याप्रकरणी देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा अहमदाबाद सायबर क्राईमसोबत काम करेल. अहमदाबाद सायबर क्राईमने खलिस्तानी समर्थक पन्नूविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आता देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा एनआयए, रॉ, सेंट्रल आयबी या प्रकरणात तपासासाठी सक्रीय झाल्या आहेत. शनिवारपासून तातडीने या तपासात प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणा सायबर क्राईमसोबत एकत्र काम करतील, असे अहमदाबाद सायबर क्राइwमचे डीसीपी अजित राजियन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये क्रिकेट विश्वचषक नव्हे, तर दहशतवादी विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामन्याच्या दिवशी फक्त खलिस्तानचा झेंडा दिसणार आहे. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. पन्नूचा ऑडिओ त्याच्या समर्थकांनी वेगवेगळ्या आयडीचा वापर करून व्हायरल केला आहे. हा ऑडिओ पन्नूनेच जारी केल्याचा दावाही करण्यात आला आहे.
4 ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्डकपला सुऊवात होणार आहे. पहिल्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे.