अमेरिकेच्या राजदूतांनी दिली माहिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अन् भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 शिखर परिषदेचे आयोजन यशस्वीपणे पार पडले आहे. या परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या अधिकृत निवासस्थानात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी बिडेन यांना प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केल्याची माहिती अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली आहे.
पुढील वर्षी क्वाड परिषदेचे आयोजन भारतात होण्याची शक्यता असल्याने बिडेन यांना प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज तसेच जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा यांनाही प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करणार असल्याचे मानले जात आहे.
2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे भारताच्या प्रजासत्ताक दिन संचलनात मुख्य अतिथी म्हणून सामील झाले होते. तर 2018 मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनासाठी भारताने तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रित केले होते.
गार्सेटी यांनी कॅनडा अन् भारतामधील वादावरही टिप्पणी केली आहे. कॅनडा हा आमचा शेजारी देश आहे. आम्ही भारताप्रमाणेच कॅनडाची देखील पर्वा करतो. हा वाद आमच्या संबंधांची व्याख्या करू शकत नाही, परंतु हा वाद निश्चितपणे संबंधांमधील प्रगती मंद करू शकतो असे मला वाटते. पारंपरिक मित्र आणि भागीदार संबंधित घटनेच्या चौकशीत सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे गार्सेटी यांनी म्हटले आहे.