आयफोन प्रेमींच्या रांगा : भारतीय बाजारात 22 सप्टेंबरपासून विक्रीला प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय बाजारपेठेत अखेर बहुप्रतिक्षीत असा आयफोन-15 हा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामध्ये आयनो 15 ची आवृत्तीची विक्री होणार असून याकरीता आयफोन प्रेमींच्या लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. ग्राहकांना आयफोन-15 मॉडेल स्टोअर्स आणि अॅपलच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अॅपलची भारतात दोन स्टोअर्स आहेत. एक मुंबईतील बीकेसी आणि दुसरे दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये स्टोअर असून हा आयफोन खरेदीकरीता या स्टोअर्समध्ये उपलब्ध झाला आहे. अमेरिकन टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलने 12 सप्टेंबर रोजी आयफोन-15 आवृत्ती सादर केली होती, त्यानंतर आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता अधिकच ताणली होती. अंतिमक्षणी ही उत्सुकता समाप्त होत आयफोन अखेर ग्राहकांनी विकत घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार मुंबईतील बीकेसी स्टोअरमधील एका व्यक्तीने सांगितले की, गुरुवारी 3 वाजल्यापासून भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरमधून पहिला आयफोन खरेदी करण्यासाठी मला 17 तास रांगेत उभे राहावे लागले आहे. ही व्यक्ती अहमदाबादहून हा आयफोन खरेदी करण्यास आल्याचे सांगितले आहे.