वृत्तसंस्था/ मेलबर्न
‘आयपीएल’ने खेळाडूंच्या वेळेवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मत्तेदारी संपुष्टात आणली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने म्हटले आहे. खेळाडूंना फ्रँचायझी क्रिकेटपेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करणे हे यापुढे एक आव्हान असेल, असे मत त्याने व्यक्त केले आहे.
जगभरातील फायदेशीर ‘टी-20’ लीगमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडचा करार नाकारण्याचा ट्रेंट बोल्टने जो निर्णय घेतला आहे तसे ते होणारच होते. कारण एक दशकापूर्वीपासून आयपीएलने खेळाचा रंगच बदलून टाकला आहे. हे घडणार असे वाटत होते, परंतु मला वाटते की ते आता घडू लागले आहे, असे कमिन्सने म्हटले आहे. कमिन्सला वाटते की, त्याच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे मानले पाहिजे. परंतु सध्याच्या भरपूर पैसे देणाऱ्या फ्रँचायझी आधारित लीगच्या काळात हे एक आव्हान असेल, असे त्याने म्हटले आहे.